Maharashtra Budget 2021 : पुणे-नाशिक जलद रेल्वेला मंजूरी, 17 वर्षांच्या लढ्याला यश आल्याने आढळराव पाटलांकडून ठाकरे सरकारचे अभिनंदन  

मंचर : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 8) विधानसभेत सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गेल्या 17 वर्षांपासूनच्या लढ्याला यश आल्याची भावना शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

पुणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या कृषी व औद्योगिक क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला मंजूरी दिल्याने माझ्यासह या भागातील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरेल अशी अपेक्षा व्यक्त करत आढळराव पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन केले आहे.

आढळराव पाटील म्हणाले, की गेल्या 17 वर्षापासून सातत्याने विविध स्तरावर पुणे-नाशिक रेल्वेसाठी पाठपुरावा केल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 2425 कोटी खर्चाच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर राज्यातील प्रकल्पांच्या कार्यन्वयनासाठी महारेलची स्थापना झाली. महारेलतर्फे या प्रकल्पाचे नव्याने सर्वेक्षण होऊन सुरुवातीला 7500 कोटी खर्च असलेल्या प्रकल्पाचे हायस्पीड रेल्वे प्रकल्पात समावेशन होऊन दुहेरी रेल्वेलाईन प्रस्तावित केली. त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या प्रकल्पाची किंमत 16 हजार 39 कोटी रुपये होऊन रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली. त्यांनतर या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी द्यावी यासाठी फेब्रुवारी 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मी भेट घेऊन आग्रही मागणी करत प्रकल्पाचे महत्व समजावून सांगितले. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आज या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली असून 3208 कोटीच्या खर्चास मंजुरी दिली आहे. लवकरच या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया सुरु होऊन पुढील 5-6 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असे आढळराव पाटील म्हणाले.