पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेट्रीनं बनवलं ‘नॅनो कोटिंग’चं मास्क, 99.99 % बॅक्टेरियाला रोखण्यासाठी मदतगार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या हवाई प्रवास असेल किंवा रेल्वे प्रवास मास्क घालणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्या बाजारात डबल आणि ट्रिपल लेयर मास्क, कपड्याचे मास्क, एन९५ मास्क असे विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. या दरम्यान पुण्यात सीएसआयआरच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने देखील एक खास मास्क तयार केले आहे, जे कोरोना महामारीमध्ये केवळ विषाणूच नव्हे तर बॅक्टेरिया आणि धुळीचे कणही रोखू शकते.

पुण्यातील सीएसआयआरच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने एक खास मास्क तयार केले आहे. हे मास्क पॉलिमर आणि मायक्रॉनचे मिश्रण आहे. त्याला polyti असे नाव दिले गेले आहे. हे मास्क बॅक्टेरिया सेल्युलोज आणि नॅनो मटेरियलपासून बनवले गेले आहे. मास्कवर नॅनो कोटिंग आहे. या मास्कमुळे ९९.९९% बॅक्टेरिया रोखले जातात. हे मास्क ७२ तास वापरले जाऊ शकते.

याबाबत सीएसआयआरचे डायरेक्टर जनरल डॉ. शेखर मांडे म्हणाले, “पुण्यात आमची एक प्रयोगशाळा आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, तेथील काही वैज्ञानिकांनी मिळून मास्क तयार केले आहे. हे एक नायट्रोसेल्युलोज मास्क आहे आणि त्यावर नॅनोकोटींग लावले आहे. याने सूक्ष्मकण देखील रोखता येऊ शकतात, त्यामुळे मास्कचा लोकांना मोठा फायदा होईल.”

या मास्कला SITRA म्हणजे साऊथ इंडिया टेक्सटाइल रिसर्च असोसिएशनकडून आवश्यक परवानगी मिळाली आहे. प्रयोगशाळेने मास्कच्या टेक्नॉलॉजीला शेअर केले आहे आणि ते तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले, “त्यासाठी आम्हाला नियामक प्राधिकरणाकडून परवानगी मिळाली आहे की आम्ही ते तयार करू शकतो. त्यानंतर आम्ही हे मास्क तयार करण्यासाठी काही एमएसएमई दिला आहे.”

सध्या सीएसआयआर आणि एनसीएलने हे तंत्रज्ञान काही कंपन्यांना मास्क तयार करण्यासाठी दिले आहे. त्याचे उत्पादनही सुरू झाले आहे. सध्या या कंपन्या दिवसाला ५००० मास्क तयार करत आहेत. लवकरच दिवसाला एक लाख मास्क तयार केले जातील, असे सीएसआयआरचे म्हणणे आहे. या मास्कची किंमत देखील बरीच कमी असण्याची अपेक्षा आहे.