Pune News : NCL च्या प्रयोगशाळेत पीएचडी करणाऱ्या 30 वर्षीय ‘पंडित’चा गळा चिरून आणि चेहरा दगडाने ठेचून खून; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चतुःश्रुंगी परिसरातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पीएचडी करणाऱ्या एका तरुणाचा गळा चिरून आणि चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह सुस खिंडीत टाकण्यात आला आहे.

सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत (वय ३०, रा. शिवनगर, सुतारवाडी, मूळ रा. जानेपळ, ता. जाफराबाद, जि. जालना) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पंडीत यांचा चुलत भाऊ संदीप (वय ३४) यांनी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात खुनासह पुरावा नष्ट करणे व इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन हा मूळचा जालना जिल्ह्यातील आहे. तो पाषाण परिसरातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) येथे रसायनशास्त्र विषयात पीएचडी करत होता. पीएचडीसाठी तो दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. सुतारवाडी भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. शनिवारी सकाळी सूस खिंडीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना मृतदेह दिसून आला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.त्यानंतर चतुःश्रुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मृतदेह दिसून आला. पंडीत यांच्या अंगावरचे कपडे काढून टाकले होते. त्यांच्या चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. तर गळ्यावर चिरण्यात आला आहे. खिशात पाकिट सापडले. त्या पाकिटातील कागदपत्रांवरून पोलिसांनी ओळख पटवली.  पंडीत यांच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड करत आहेत.