‘इलेक्टीव्ह मेरीट’ पण, राष्ट्रवादीवर ओढवणार उमेदवार ‘सर्च’ करण्याची वेळ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीवेळी पुण्याच्या जागेवर दावा ठोकून काँग्रेसची कोंडी करणाऱ्या राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र यंदा ‘इलेक्टीव्ह मेरिट ‘नुसार उमेदवारी निश्चित करण्याचे धोरण अवलंबविले जाणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत यापूर्वी असणाऱ्या गटातटाच्या राजकारणाला पूर्णविराम मिळणार आहे. असे असले तरी यंदा लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी लाट पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपलाच कौल मिळेल हे गृहीत धरून काहींनी आतापासूनच आम्हाला उमेदवारी नको असा सूर आळवल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर उमेदवार शोधण्याची वेळ ओढवण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी बैठक घेऊन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ८० जागा आताच निश्चित केल्या आहेत आणि तेथील संभाव्य उमेदवारही गृहीत धरले आहेत.  मात्र या बैठकीला जे उपस्थित नव्हते, त्यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून घेण्यात आल्याने ‘ते ‘संभाव्य उमेदवारही हादरले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला पर्यायाने मोदी सरकारला मिळालेले अभूतपूर्व यश पाहता,  येत्या विधानसभेलाही त्याची पुनरावृत्ती होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक लढवून नाहक पैसा खर्च करण्याची तयारी इच्छुकांची नाही. त्यात राष्ट्रवादीने पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेऊन कोणत्या जागा फायदेशीर आहेत याचे गणित जुळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. गत विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्यात आली होती त्यामुळे यंदा जरी आघाडी करून लढण्याचे ठरले असले तरी ऐनवेळी राष्ट्रवादीकडून कोणती भूमिका घेण्यात येते यानुसार पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

तूर्तास जादा जागा घेण्याचे मनसुबे राष्ट्रवादीचे आहे. त्यानुसार पुण्याच्या आठही विधानसभा मतदारसंघात ‘इलेक्टीव्ह मेरिट’ नुसार कोणते चेहरे चालतील याचे सर्वेक्षण झाले आहे. त्यानुसार काही संभाव्य उमेदवार राष्ट्रवादीने ठरविले आहेत. तर काही मतदारसंघात ज्या चेहऱ्यांना जनमानसाचा कौल आहे, अशा ठिकाणी ते भले काँग्रेस पक्षातील असो, त्यांना राष्ट्रवादीत आणून रिंगणात उभे करण्याची रणनीती राष्ट्रवादीने आखली आहे. त्यानुसार पर्वती मतदारसंघात हा ‘ प्रयोग’ होणार हे अटळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, मात्र त्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची स्थिती उदभवू शकते याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले आहे. सध्या पुण्यातील शिवाजीनगर, खडकवासला, वडगावशेरी, कॅंटोन्मेंट, हडपसर, कोथरूड, पर्वती, कसबा या मतदारसंघात कोणते प्रश्न सुटले नाहीत, कोणती ठोस विकासकामे हवीत, नागरिकांना काय अपेक्षित आहे यानुसार विविध प्रश्नांचा आढावा घेऊन त्यानुसार जाहीरनामा तयार करण्याबाबत आदेश देण्यात आल्याची चर्चा राष्ट्रवादीत आहे.

 

मात्र या आठही मतदारसंघात जागा वाटपाच्या रणनीतीमध्ये वाताहत झालेल्या काँग्रेसची कोंडी करून ‘आमची ताकद जास्त’ यावरून वेठीस धरण्याचे आणि काँग्रेसमधील काही ‘इलेक्टीव्ह ‘ चेहरे राष्ट्रवादीच्या गोटात आणण्याची खेळी होणार असेही बोलले जात आहे. असे असले तरी हडपसर आणि वडगावशेरी आणि खडकवासला वगळता राष्ट्रवादीकडे ठोस असे उमेदवार नाहीत, उलट या दोन मतदारसंघात इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा होणार आहे. तर उर्वरित मतदारसंघात जे आधी इच्छुक होते, त्यांनी आता लढायचे नाही असा पवित्रा घेतला आहे . परिणामी इलेक्टीव्ह मेरिटचा फॉर्म्युला वापरून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादीला पुण्याच्याबाबतीत हडपसर व वडगावशेरी वगळता अन्य मतदारसंघात उमेदवार शोधण्याची वेळ ओढवणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

सिनेजगत

काळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानबाबत जोधपूर कोर्टाचा ‘मोठा’ निर्णय

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’