Pune : भिडे पुलाखालील नदीपात्रात फोटो काढत असताना वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भिडे पुलाखालील नदीपात्रात फोटो काढत असताना वाहून गेलेल्या दोन तरुणांचा शोध एनडीआरएफला लागला असून, एकाचा मृतदेह नाना-नाणी घाटाजवळ तर दुसरा संगमब्रिजजवळ सापडला आहे.

सौरभ कांबळे (वय 19, रा. ताडीवाला रोड) व ओंकार तुपधर (वय १८) हा अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने दोन दिवसांपूर्वी मुळा-मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास सौरभ व ओमकार व एक मित्र भिडे पुलाजवळ नदीपात्रात उतरून फोटो काढत होते. कपडे काढून ते पाण्यात उतरले होते. यावेळी एकजण वाहून जाऊ लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सौरभ गेला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले होते. अग्निशमन दल व एनडीआरएफ जवानांनी कालपासून या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दिवसभर शोध घेतला. पण ते मिळाले नव्हते. मात्र आज सकाळी नाना-नाणी पार्क घाटात सौरभ याचा मृतदेह मिळाला आहे. तर दुसऱ्या टीमला ओंकार याचा संगमब्रिजजवळ नदीपात्रात मृतदेह मिळाला आहे. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून, नातेवाईकांनी ते ओळखला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.