Pune : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या, हडपसरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नात मानपान व्यवस्थित केला नाही तसेच दागिने, पैसे दिले नसल्यावरून पती व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसर परिसरात ही घटना शुक्रवारी घडली आहे.

अश्विनी वैभव जाधव (वय 24, रा. साडे सतरानळी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती वैभव जाधव व इतरांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनी यांचा भाऊ अनिकेत काशीद (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचा वैभवसोबत गेल्या वर्षी (मार्च 2019) मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर अश्विनी या पती व सासरच्या व्यक्तींसोबत हडपसर येथे राहत होत्या. लग्नाच्या पाचच दिवसानंतर पती व इतरांनी अश्विनी यांना लग्नात मानपान केला नाही. व्यवस्थित लॉन्समध्ये लग्न करून दिले नाही, वस्तू, पैसे व दागिने केले नाही असे म्हणत छळ सुरू केला. तसेच घरातील कामे येत नाहीत, असे म्हणत त्यांना शिळा राहिलेला स्वयंपाक खाण्यास देत असे. तू निघून जा आम्ही दुसरे लग्न करून देऊ असे म्हणत त्यांच्या शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून अश्विनी यांनी शुक्रवारी राहत्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी तक्रार येताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

You might also like