Pune News : भरदिवसा पादचारी महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वारांनी लुटले 3.60 लाखाचे दागिने, विश्रांतवाडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भरदिवसा पादचारी महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी गळ्यातील ३ लाख ६० हजार रूपयांचे दागिने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला असून, विश्रांतवाडी भागात हा प्रकार घडला आहे. त्यांच्या मुलाने मोबाईल शॉपीचे दुकान टाकले आहे. त्यानिमित्ताने त्या उद्घाटन प्रसंगी गेल्या होत्या.

याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या टिंगरेनगर परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्या मुलाने नवीन मोबाईल शॉपीचे दुकान टाकले आहे. त्याची सुरुवात काल झाली. त्यानिमित्त छोटेखानी उद्घाटन होते. त्यामुळे त्या आल्या होत्या. उद्घाटन झाल्यानंतर फिर्यादी या एकट्याच पायी चालत घरी जात होत्या. त्या लिली इमारतीसमोरून जात असताना अचानक भरधाव दुचाकीवर पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, नेकलेस असा तबल ३ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यांनी आरडाओरडा केला पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सचिन निकम करत आहेत.