Pune News : जवानांसाठी पुणेकरांकडून 200 KG तिळगूळ ! शनिवार पेठ मेहुणपुरा मंडळ व सैनिक मित्र परिवारतर्फे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारताच्या सीमेचे प्राण पणाला लावून, स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता रक्षण करणा-या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून सुमारे २०० किलो तिळगूळ देशाच्या सरहद््दीवरील सैनिकांना पाठविण्यात आला. भारत माता की जय… अशा घोषणा देऊन सैनिकांप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करीत तिळगूळाचे पूजन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सुरु असलेल्या या उपक्रमात सुमारे २५ संस्था व मंडळांनी सहभाग घेत हा आपुलकीचा ठेवा सैनिकांपर्यंत पोहोचवून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवच जणू पुणेकरांना करुन दिली.

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुप्ते मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.नंदू फडके, वीरमाता उर्मिला मिजार, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. लायन्स क्लब आॅफ विजयनगर, लायन्स क्लब आॅफ सहकारनगर, करिश्मा ज्येष्ठ नागरिक संघ, एलआयसी शिवाजीनगर व कोथरुड, साम्राज्य ज्येष्ठ नागरिक मंच, पोटसुळ्या मारुती मंडळ, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, सेवा मित्र मंडळ, कलातीर्थ, गरुड गणपती मंडळ आणि इतर संस्था व सार्वजनिक मंडळांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला.

अ‍ॅड. नंदू फडके म्हणाले, सैनिकांप्रती आपले असलेले प्रेम दर्शविण्यासाठी प्रेमाचे प्रतिक म्हणून तिळगूळ पाठविला जात आहे. तिळाच्या प्रत्येक कणातून सैनिकांच्या अंगात हजार हत्तींचे बळ यावे, ही यामागील भावना आहे. सैनिकांच्या कुटुंबांच्या मागे सैनिक मित्र परिवारासारख्या संस्थांनी ठामपणे उभे रहायला हवे. त्यामुळे सैनिकांमध्ये भारतीयांविषयी असलेला आत्मविश्वास अधिक दृढ होईल, तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कोणीतरी आहे, ही भावना देखील निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले.

सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ म्हणाले, सन १९९६ पासून सैनिक मित्र परिवाराचे कार्य सुरु आहे. यंदा हे कार्य २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सण-उत्सव सैनिकांसोबत साजरे करावे, या संकल्पनेतून मकरसंक्रांतीचा उपक्रम सुरु झाला होता. समाजामध्ये एकतेचा संदेश देण्याचा आणि देशाप्रती प्रेम जागृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जम्मू-काश्मिरपासून ते राजस्थानपर्यंतच्या सिमेवर हा तिळगूळ सैनिकांना पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शाहीर हेमंत मावळे यांनी सैनिक माझे नाव… हे गीत सादर केले. योगिनी पाळंदे, राजश्री शेठ, नीला कदम, कल्याणी सराफ, उमेश सकपाळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.