Pune News : एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय मंजुळाची आत्महत्या, तरूणावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंजुळा संजय पवार (वय 21, रा. तळजाई वसाहत) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सन्नी पाटोळे या तरुणावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीच्या आईने तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी एकाच परिसरात राहण्यास आहेत. आरोपी सन्नी याचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र तरुणीने त्याला नकार देत असे. पण, तो तरुणीला मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यासोबत लग्न कर अन्यथा मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत होता. तसेच याबाबत कोणास काही सांगितल्यास तुला अन तुझ्या भावाला सोडणार नाही, असेही म्हणत तिच्यावर दबाव टाकत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात या तरुणीने आत्महत्या केली आहे. तिच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी सांगितले.