Pune News : सिरममध्ये लागलेल्या आगीत 22 वर्षाच्या प्रतीकचा गेला जीव, कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काल गुरुवारी भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच पण येथे इमारतीचे काम करणाऱ्या 5 कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. यात 22 वर्षीय प्रतीक पाष्टे या तरुणाचाही देखील समावेश होता. तोच कुटुंबाचा आधार होता. पण त्याचा अश्या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रतीक पुण्यातील प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक 14 मध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. तोच कुटुंबाचा आधार होता. प्रतीक मोठा असून, आई-वडील व छोट्या भाऊ आहे. त्याचे वडील आजारी असून त्यांना बुधवारीच रुग्णालयात दाखल केले आहे. प्रतीक आता या जगात नाही हे त्याच्या वडिलांना अजूनही माहित नाही. त्याचा छोटा भाऊ 14 वर्षाचा असून तो शिक्षण घेतोय. तर आई प्रभात रस्त्यावरील एका गल्लीत चहाची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. प्रतीकचे झील महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाले आहे. कुटुंबीयांचा आधारस्तंभ बनण्यासाठी प्रयत्न करत होता.

गुरुवारी दुपारी आपल्या वरिष्ठ सहकार्‍यांसोबत सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यासाठी गेला होता. तो परत आलाच नाही. या दुर्घटनेत प्रतीक सह त्याच्या वरिष्ठ सहकारी महिंद्र इंगळे यांचादेखील होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे.