Pune News : अल्पवयीन मुलीचा विनायभंग करणाऱ्याला 3 वर्षे सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कॉलेजमधून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी हा निकाल दिला.

Advt.

अनिल राजेंद्र लिंबोरे (वय २४, रा. शिवरी, ता. पुरंदर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पुरंदर तालुक्‍यातील वाळूंज येथे घडलेल्या या प्रकाराबाबत १६ वर्षीय मुलीने जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपनिरीक्षक एन. एच. सोनवलकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्त्वाची ठरली.

संबंधित मुलगी महाविद्यालयातून घराकडे चालली होती. त्यावेळी “थांब तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणत लिंबोरे याने तिचा हात धरून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. लिंबोरे याने दंड भरल्यास ती रक्कम पीडितेला देण्यात यावी. तर दंड न भरल्यास लिंबोरे याला तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.