Pune News : वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 30 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी (एम.डी ) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरूण डॉक्टरला ३० लाख १० हजारांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

संतोषकुमार आणि शामा सर उर्फ बाबूभाई अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २६ वर्षीय डॉक्टरने हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जुलै ते ऑक्टोबर कालावधीत हडपसर परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणाने एमबीबीएस पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी एका वेबसाईटवर ऑनलाईनरित्या अर्ज केला होता. त्यानुसार एकाने त्यांना फोन करून एम.डीला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी केली. त्यानुसार डॉक्टर आणि संबंधित फोनकत्र्यांचे बोलणे सुरू झाले. विविध फी आणि प्रोसेसिंगच्या नावाखाली संतोषकुमार आणि त्याचा साथीदार शामा सर उर्फ बाबूभाई यांनी संबंधित डॉक्टरकडून ऑनलाईनरित्या टप्प्याटप्प्याने ३० लाख १० हजार रूपये बँकखात्यावर जमा करून घेतले. त्यानंतर फोन बंद केला. रक्कम जमा करूनही एम.डी शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे तरूणाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.