Pune News : धनकवडीमधील आदर्श पतसंस्थेत 47 कोटींचा अपहार, व्यवस्थापक बनसोडे, रोखपाल जोगदंड अन् लिपीक जोगदंड अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या 47 कोटी 9 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पतसंस्थेतील व्यवस्थापकासह तिघांना अटक केली आहे. 2020 मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पतसंस्थेच्या धनकवडी शाखेचे व्यवस्थापक काशीनाथ केरबा बनसोडे, रोखपाल गौतम नाना जोगदंड (दोघे रा. आंबेगाव पठार, धनकवडी), लिपिक शंकर सटवा जोगदंड (रा. आंबेगाव पठार) यांना अटक केली आहे. याबाबत विशेष लेखा परिक्षक विलास काटकर यांनी तक्रार दिली आहे.

धनकवडी येथे आदर्श पतसंस्था आहे. या पतसंस्थेत गैरव्यवहार प्रकरणात सहकारी संस्थेकडून लेखापरिक्षण करण्यात आले होते. लेखापरिक्षणात पतसंस्थेतील संचालकांसह कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा अपहार केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. याप्रकरणी आता गुन्हे शाखेने व्यवस्थापकासह तिघांना अटक केली.

दरम्यान आदर्श नागरी पतसंस्थेत गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे १६१ ठेवीदारांनी आतापर्यंत तक्रारी दिल्या आहेत. अपहार प्रकरणात पतसंस्थेच्या संचालकांचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अनिता मोरे, संजय कराळे, धनश्री सुपेकर, संदीप गिर्हे, अमृता हरबा यांनी ही कारवाई केली.