Pune News : चंदननगर परिसरात शतपावली करणार्‍या महिलेकडील 48 हजारांची सोनसाखळी लांबवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  चांदणी चौकात सोन साखळी हिसकवल्याची घटना ताजी असताना चंदननगर परिसरात देखील शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 48 हजार रुपयांची सोन साखळी चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शहरात आता घरफोड्या वाहन चोरीसोबतच सोन साखळी चोरट्यांनी उच्छाद घातल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वडगावशेरी परिसरात राहत आहेत. दरम्यान त्या दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या नातेवाईक महिलेसोबत घराजवळ असलेल्या सनराईज को. ऑपरेटिव्ह सोसायटीच्या समोरील रस्त्यावर शतपावली करत होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 48 हजार रुपयांची सोन साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. त्यांनी आरडाओरडा केला. पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. गस्त वाढवून देखील या वाढत्या घटना रोखणे पोलिसांना येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुणेकर मात्र चिंतेत आहेत.