Pune News : 61 वर्षीय महिलेची Facebook व्दारे झाली ‘त्या’च्याशी ओळख, भामटयानं घातला 13 लाख 17 हजारांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   फेसबुकच्या माध्यमातून झालेली ओळख एका जेष्ठ महिलेला चांगलीच महागत पडली आहे. गिफ्ट पाठवले असल्याचे सांगत महिलेकडून १३ लाख १७ हजार रुपये उकळले आहेत. जानेवारी ते जून २०२० या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी ६१ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेस इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. त्या मुंढवा परिसरात राहतात. जानेवारी २०२० मध्ये त्यांना फेसबुकवर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारली. यानंतर त्यांची या महिलेसोबत ओळख झाली. ओळखीनंतर त्या आरोपी महिलेने त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेसह एकाने त्यांच्याकडून १३ लाख १७ हजार रुपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडत त्यांची फसवणूक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.