Pune News : मार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करणार्‍या 7 जणांना कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोयते, तलवारी, रॉड घेऊन मार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करत एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली.

किरण विनोद थोरात (वय २८), सागर अनिल लोखंडे (वय २२), सचिन परशुराम माने (वय २५), सौरभ नितीन अदमाने (वय १९), तेजस रामविलास यादव (वय १९), सोमनाथ ज्ञानदेव शिंदे (वय २१), रोहित ऊर्फ अनिल बाळकिसन कडू (वय २४) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत ४२ वर्षीय व्यक्तीने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २७ जानेवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मार्केटयार्डातील आंबेडकर नगर भागात ही घटना घडली. आरोपींनी घातक हत्यारे जवळ बाळगत परिसरात आरडाओरड करत दहशत निर्माण केली. त्यानंतर, फिर्यादी यांना धमकी देत त्यांच्या वडापाव व कबाब विक्रीच्या स्टॉलवरील गल्ल्यात ठेवलेले पैसे जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर, त्यांपैकी काहींनी परीसरातील ३० ते ४० वाहनांची तोडफोड केली. यावेळी एकावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यातील किरण थोरात विरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात नऊ, सचिन माने विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात पाच तर सागर लोखंडे याविरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संजय दिक्षित यांनी केली होती.