Pune News : मामाच्या गावाला निघालेल्या 7 वर्षाच्या चिमुकलीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आईसोबत मामाला भेटण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात एका सात वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे स्टेशनजवळ असलेल्या आरटीओ ऑफिस समोर झाला. टँकरने दुचाकीला जोरात धडक दिल्याने सात वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी टँकर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

श्री दत्तात्रय थोरात (वय-7, रा. शिवनेरी नगर, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर मनीषा दत्तात्रय थोरात (वय-38) असे गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव आहे. पोलिसांनी टँकर चालक राम बाबू खाडे याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या मनिषा थोरात या आपल्या दुचाकीवरुन दुपारी चाकण येथे रहात असलेल्या भावाला भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी सात वर्षाची श्री देखील त्यांच्यासोबत होती.

मनिषा या पुणे स्टेशन जवळ असलेल्या आरटीओ ऑफिस समोरील पेट्रोल पंपापासून संगमवाडी कडे जात होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरची धडक मनिषा यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये सात वर्षाची चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर मिनषा यांच्या पायाला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टँकर चालकाला अटक केली असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.