Pune News : कुख्यात निलेश बसवंत याच्याविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खोट्या कागदपत्रावर जामीन देणाऱ्या आणि मिळवणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वीच भांडाफोड झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, कूविख्यात गुंड निलेश बसवंत याने शिवाजीनगरच्या मोक्का न्यायालयात खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने हा सर्व प्रकार समोर आणत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो कारागृहात आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश बसवंत हा सराईत गुन्हेगार आहे. तो गुंड बापू नायर टोळीचा प्रमुख साथीदार आहे. त्याला २०१५ मध्ये पुणे पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक केली होती. यादरम्यान त्याने दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळविला. निलेश बसवंत हा 16 एप्रिल 2020 रोजी तात्पुरते जामिनावर येरवडा जेल मधून बाहेर आला आहे व तेव्हापासून तो जामिनाचा तात्पुरती मुदतवाढ घेऊन अद्याप पर्यंत जामिनावर बाहेरच आहे. दरम्यानच्या काळात त्याने सातारा येथील कॅन्सर हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे बनावट पत्र तयार करून त्याने शिवाजीनगरच्या मोक्का न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. याचा संशय गुन्हे शाखेच्या पोलिसांना आला. त्यानुसार निलेशने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. त्याशिवाय ज्या खासगी दवाखान्यात तो गेला होता. त्या रुग्णालयात जाउन त्याच्याबाबत माहिती घेतली. त्यावेळी त्याने साताऱ्यातील शेंद्रे येथील डॉ. दत्तात्रय अंदुरे यांचे खोटे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केल्याचे उघडकीस आले आहे.

आता त्याने शिवाजीनगर न्यायालयासोबतच सुप्रिम कोर्टात देखील जामिनासाठी अर्ज केला आहे. याठिकाणी देखील कागदपत्रे सादर केली आहेत. त्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण शिर्के, सुजीत वाडेकर, राहूल जोशी, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.