Pune News : इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजजवळ घडली. थांबून क्रेनने विटा वाहून नेण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला आहे. शत्रुघ्न ब्रिजबिहारी विश्वकर्मा (वय 30) असे मृत्यु झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी भारत ब्रिजबिहारी विश्वकर्मा यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार ठेकेदार राजू गोविंद राठोड (वय 35, रा. वडाची वाडी, उंडरी) व प्रकाश शिवराम साहू (वय 35, गंधर्व लौंस समोर, सातारा रोड, कात्रज) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सातारा रस्त्यावर बोरा रियालिटी या इमारतिचे काम सुरू आहे. याठिकाणी ठेकेदार राजू व प्रकाश हे कामगारांकडून काम करून घेत आहेत.

शत्रुघ्न हा बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर थांबून क्रेनच्या सहाय्याने लोखंडी हातगाडीवरील विटा वाहण्याचे काम करत होता. यादरम्यान तोल गेल्याने तो पहिल्या मजल्यावर खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

आरोपी असलेल्या ठेकेदारांनी कामगारांना काम करतेवेळी सुरक्षा बेल्ट, हेल्मेट देणे गरजेचे असतानाही त्यांनी दिले नाही. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे मजुराचा मृत्यू झाल्याचे म्हणले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मसाले करीत आहे.