खुशखबर ! 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करण्यासाठी येत्या आठ दिवसांध्ये प्रस्ताव !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अधिकारी आणि कर्मचारी, तसेच शिक्षण विभागाकडील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करण्यासाठी प्रशासनाकडून येत्या आठ दिवसांध्ये विहित नमुन्यात शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त अनिल मुळे यांनी आज सर्वसाधारण सभेत दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच महापालिका कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतन आयोगाचा आणि ग्रेड पेचा तिढा सुटणार हे स्पष्ट झाले आहे.

हेमंंत रासने आणि दीपक पोटे या सदस्यांनी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगातील ग्रेड पे नुसार सातवा वेतन आयोग लागू करावा असा प्रस्ताव दिला होता. यावर नगरसेवक विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, अरविंद शिंदे यांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना ही सातवा वेतन आयोग लागू करावा अशी उपसूचना दिली. या उपसुचनेसह प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे यांनी सदस्यांना प्रस्ताव मांडावा लागतो हे दुर्दैव आहे. प्रशासनाने खरेतर सातवा वेतन आयोग लागू करणे गरजेचे होते.

दरम्यान उपआयुक्त अनिल मुळे यांनी सांगितले, की राज्य शासनाने सर्व स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीमध्ये स्थानीक स्वराज्य संस्थांचे अनुदानेतर मूळ उत्पन्न, व्यवस्थापनाचा खर्च, सातवा वेतन आयोग लागू केल्यास वाढणारे दायित्व, यामुळे उत्पन्नात येणारी तूट कशी भरून काढणार याचे उपाय अशा सविस्तर तालिकेमध्ये माहिती मागविली आहे. ही सविस्तर माहिती येत्या आठ दिवसांच्या आतमध्ये राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यावर राज्य शासनाकडून येणार्‍या आदेशानुसार सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –