Pune News : पुणे महापालिका हद्दीतील सुमारे 80 % रस्ते गल्लीबोळांचे; अतिक्रमण आणि पार्किंगमुळे वाहतुक कोंडी आणि प्रदूषणात भर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्याची लोकसंख्या ५० लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाहनांची संख्याही जवळपास ४५ लाख झाली आहे. मात्र, शहरातील १ हजार ६५३ कि.मी.च्या रस्त्यांपैकी तब्बल ८८६.४२ कि.मी.चे रस्ते हे ६ मी. रुंदीचे असून ५११ कि.मी.चे रस्ते हे ९ मी. रुंदीचे अर्थात वाहन संख्येच्या तुलनेने अपुरे असल्याने मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला सामोरे जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

पुणे शहराचा आकार मागील काही वर्षात वाढत आहे. औद्योगीक आणि शैक्षणिक केंद्रामुळे रोजगाराच्या निमित्ताने गेल्या काही २५ ते ३० वर्षात शहराची लोकसंख्या जवळपास दुप्पट झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्या तुलनेत सक्षम न झाल्याने शहरात दुचाकी, लहान मोटारी, रिक्षा आणि बसेसची संख्या ४५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. देशाच्या मध्यवर्ती शहर असल्याने बाहेरील जिल्ह्यातून आणि राज्यातून येणार्‍या वाहनांची यामध्ये भर पडत असते.

लोकसंख्या आणि खाजगी वाहनांच्या तुलनेते शहरातील रस्त्यांची संख्या कमी आहे. किंबहुना जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यापैकी जवळपास ७० टक्के हे अरुंद आहेत. ९ मी.हून अधिक रुंदीचे बहुतांश रस्ते हे उपनगरी भागात आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात जुन्या वाड्यांची संख्या अधिक असल्याने याठिकाणच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा वेग फारच कमी आहे. तर उपनगरीभाग महापालिकेत समाविष्ट होण्यापुर्वी अनधिकृत आणि गुंठेवारीतील बांधकामांमुळे दाटीवाटीचा झाला आहे. जागेअभावी मलनिस्सारण, पाईपलाईन्स व अन्य सेवा वाहीन्या याच रस्त्यांच्या खालून गेल्याने सर्वच रस्त्यांवर असमतल चेेंबर्समुळे वाहतुकीचा वेग मंदावतोच. परंतू यासोबतच जुन्या शहरात इमारती अथवा वाड्यांमध्ये तर उपनगरी भागातील गुंठेवारी व अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी पार्किंगची सुविधा नसल्याने सर्व वाहने याच रस्त्यांवर असतात. विशेष असे की याच रस्त्यांच्या कडेला अनधिकृतपणे व्यवसाय करणार्‍यांची संख्याही मोठी आहे. यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यांना गल्लीबोळांचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. पार्किंगवरून सातत्याने होत असलेल्या वादांचे पर्यवसन अगदी खूनांपर्यंत जावू लागले आहे. प्रवासाला लागणार्‍या वेळेमुळेही कामगार आणि विद्यार्थी वर्गामध्ये चिडचिडेपणा वाढत चालला आहे. याचा राग वाहतुकीचे नियोजन करणार्‍या पोलिसांवरही निघत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

सार्वजनिक वाहतुकीचा विलंबाने विकास, रस्त्यांच्या कडेला असलेली अतिक्रमणे, लोकसंख्या आणि वाहन संख्या वाढीच्या वेगाच्या तुलनेत रस्ता रुंदी व अन्य पर्याय निर्माण करण्याचा वेग कमी असल्यानेच ही परिस्थिती ओढावली असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.