अटक करण्याची धमकी देत सहाय्यक निरीक्षकानं पोलिस ठाण्यातच घेतला 5 लाखाचा धनादेश, व्यापार्‍याची पोलिस आयुक्तांकडे ‘धाव’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे पोलीस आयुक्त सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांची प्रतिमा चांगली बनविण्याचे प्रयत्न करत असताना मध्यवस्तीमधील एका पोलीस स्टेशनच्या तपास पथक प्रमुखाने पैसे दे, अन्यथा गुन्हा दाखल करून अटक करेल अशी धमकी देत ५ लाख रुपयांचा चेकच ठाण्यातच जबरदस्तीने लिहून घेतला आहे. व्यापाऱ्याने मुख्यमंत्री तसेच पोलीस आयुक्ताकडे तक्रार करत न्याय मागितला आहे. त्यामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

४७ वर्षीय व्यापाऱ्याचा वडिलोपार्जित मार्केटयार्ड परिसरात धान्य बाजाराचा व्यायसाय आहे. काही वर्षांपूर्वी खडक भागातील एका व्यापाराशी त्यांची ओळख झाली होती. या दोघांनी एका पावर प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतविले होते. तसेच तक्रारदार यांना हातऊसने ४ लाख रुपये दिले होते. तक्रारदार यांनी केलेल्या गुंतवणूकीतून पैसे मिळाल्यानंतर त्या व्यापाऱ्यास पैसे देणार होते. मात्र गुंतवणूक केलेल्या व्यापारी आजारी असल्याने त्यांचा पावर प्रोजेक्ट आहे त्या परिस्थितीत राहिला. त्यामुळे यातील तक्रादार पैसे परत करू शकले नाही.

यामुळे खडकमधील व्यापाऱ्याने तक्रारदार यांच्याकडे पैसे देण्याचा तगादा लावला. त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करत दमदाटी सुरु केली. तर, याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारअर्जही दिला होता. काही महिन्यांपूर्वी व्यापारी काही व्यक्तींना घेऊन तक्रारदार यांच्या घरी गेला. तसेच १५ लाख रुपये देण्याची मागणी  केली. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांना घरातून सोबत घेतले आणि दिवसभर घेऊन फिरले. यानंतर रात्री खडक पोलीस ठाण्यात जबरदस्तीने नेण्यात आले. याठिकाणी पोलीस स्टेशनच्या तपास  पथकाचे सहायक निरीक्षक उमाजी राठोड यांनी तात्काळ पैसे दे, अन्यथा गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने ५ लाख रुपयांचा एच.डी.एफ.सी. बँकेचा चेक (चेक क्रमांक- ३१२११५) लिहून घेतला. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. पुन्हा व्यापारी गेल्या दोन  दिवसापासून तक्रारदार याना फोन करून पैसे देण्यासाठी धमकावत असल्याने तक्रारदार यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व मुख्यमंत्री याना तक्रार दिली आहे.

याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले की, तक्रार अर्जावर चौकशी सुरु आहे. यातील तक्रारदार जबाबासाठी आलेले नाहीत. दोन दिवसात चौकशी पूर्ण होईल.

Visit : Policenama.com