पुणे : समान पाणी पुरवठा योजनेचे भवितव्य अधांतरी, नगरसेवकांनीच मीटर काढायच्या दिल्या नागरिकांना सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नागरिकांना समान पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने राबविलेली चोवीस तास पाणी पुरवठा योजना पुर्ण होण्याअगोदरच अयशस्वी ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकतर या योजनेतील पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनच्या कामाला जवळपास सव्वा डझन माननीयांनकडूनच आडकाठी आणली आहे. तर धानोरी सारख्या परिसरात ज्या ठिकाणी ग्राहकांसाठी पाण्याचे मीटर बसविले आहेत, ते मीटरच माननीययांच्या सूचनेवरून नागरिकांनी काढून घरात ठेवले असून काही ठिकाणी मीटरच्या अलिकडूनच पाईपलाईन जोडून घेतल्याच्या तक्रारींची चर्चा पाणी पुरवठा विभागात सुरू झाली आहे. महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली मात्र सत्ताधार्‍यांपुढे त्यांचे काहीच चालेना अशी स्थिती निर्माण झाल्याने या योजनेचे भवितव्य अधांतरी दिसून येत आहे.

शहराची भौगोलीक रचना आणि वाढलेला परिसर यामुळे मागील काही वर्षांपासून शहरात पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. त्याचवेळी लोकसंख्या वाढत असताना पाटबंधारे विभागाकडून मिळणार्‍या पाण्यावरही मर्यादा आल्या असून अद्याप महापालिकेला पाणी वाढवून देण्याचा करार करण्यात आलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर मागील काही वर्षांपासून शहरात चोवीस तास पाणी योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले गेले. या योजनेअंतर्गत उभारण्यात येणार्‍या ८३ टाक्यांच्या कामाला राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीच्या पालिकेतील सत्ता काळात सुरूवात झाली. तर पाईपलाईन आणि मीटर बसविण्याचे काम हे भाजपच्या सत्ताकाळात सुरू झाले आहे. परंतू पाईपलाईन आणि मीटर बसविण्याच्या कामाच्या निविदा जवळपास एक हजार कोटी रुपयांनी फुगविल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधकांनी मोठा गदारोळ माजविला. यामुळे सत्ताधारी भाजपला फेरनिविदा काढण्याची नामुष्की आली. आणि खरोखरच फेरनिविदा एक हजार कोटी रुपयांनी कमी आल्या.

परंतू यानंतरही या योजनेेचे काम पुढे सरकत नसल्याचे निदर्शनास येत आहे. पाण्याच्या टाक्या बांधताना काही नगरसेवकच त्याला विविध कारणांसाठी आडकाठी आणत आहेत. विशेष असे की सुरवातीला या कामाचे क्रेडीट घेण्यासाठी पुढे असलेली ही मंडळी कशासाठी आडवणूक करत आहेत? याची मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. विशेष असे की एखाद विरोधी पक्षाचा नगरसेवक वगळता आडकाठी आणणारी बहुतांश मंडळी ही सत्ताधार्‍यांपैकीच असल्याची चर्चा पालिकेत आहे. एवढेच नव्हे तर पाईपलाईनच्या कामासाठी आपल्या प्रभागामध्ये खोदाई करण्यासही ही मंडळी ठेकेदारांना आडवत आहेत. ठेकेदारांना आडवण्याचा काय हेतू? हाही पालिकेतील पारदर्शक कारभाराचा आरसा दाखविण्याचा प्रकार असल्याचे बोलले जावू लागले आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी वडगाव शेरी मतदारसंघामधील धानोरी परिसरात या योजनेअंतर्गत ग्राहक मीटर बसविण्यास सुरूवात झाली आहे. जवळपास पाचशेहून अधिक मीटर बसविण्यात आले आहेत. परंतू अल्पावधीतच एका माननीयांच्या सूचनेवरून नागरिकांनी हे मीटर काढून घ्यायला सुरूवात केली आहे. तसेच काही ठिकाणी मीटर दिसत असले तरी मीटरच्या अलिकडूनच बायपास करून कनेक्शन घेतल्याच्या तक्रारी पाणी पुरवठा विभागाकडे आल्या आहेत. या तक्रारींबाबत आयुक्तांनाही कल्पना देण्यात आली असून त्यांनी सत्ताधार्‍यांशी संपर्क केला आहे. परंतू निवडणुका होवू द्या, मग पाहू असा माफत प्रतिसाद सत्ताधार्‍यांकडून मिळत असल्याने चोवीस तास पाणी योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

वडगाव शेरी मतदारसंघातील एका विरोधी पक्षाच्या एका माननीयांने मीटर काढण्याच्या सूचना नागरिकांना दिल्याची पालिकेत चर्चा आहे. विशेष असे की हे माननीय विरोधी पक्षात असले तरी वडगाव शेरीतील भाजपच्या एका वरिष्ठ लोकप्रतिनिधीचे नातेवाईक असून मागील निवडणुकीमध्ये त्यांना आतून मदतच केली होती. योगायोगाने अता विधानसभा निवडणुक होणार असून मीटर बसविल्याचा या नातेवाईकाला निवडणुकीत फटका बसू नये म्हणूनच तूर्तास नागरिकांनाच मीटर काढून ठेवण्याच्या सूचना दिल्याची जोरदार चर्चा वडगाव शेरी परिसरात आहे.

Visit :- policenama.com