विधानसभा 2019 : हडपसरकर MLA ला पुन्हा संधी देणार ? युतीतील जागा वाटप आणि सामाजिक समीकरण ठरवणार यंदाचा आमदार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात हाय होलटेज म्हणून ओळखला जाणारा मतदार संघ म्हणून हडपसर मतदार संघ कायमच चर्चेत राहिला आहे. एका आमदाराला पुन्हा संधी नाही, अशीच काहीशी मानसिकता असलेल्या हडपसर मतदार संघात यंदा परिवर्तन होणार ? याची उत्कंठा वाढली आहे. यासाठी काही तास वाट पाहावी लागणार आहे ती भाजप – शिवसेना युतीमध्ये हा मतदार संघ कोणाच्या वाटयाला येतो, यावर सर्व गणिते अवलंबून आहेत.

पूर्वीचा कॅन्टोन्मेंट आणि 2009 पासून हडपसर असे नामकरण झालेल्या या मतदार संघामध्ये 2014 च्या निवडणुकीत भाजपचे योगेश टिळेकर यांनी बाजी मारली होती. तत्पूर्वी भाजप – शिवसेना युती असताना हा मतदार संघ शिवसेनेकडे होता. अलीकडच्या काही निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर, शिवसेनेचे सूर्यकांत लोणकर, महादेव बाबर आणि भाजपचे योगेश टिळेकर असे आलटून पालटून सत्ताबद्दल झाले आहेत. शक्यतो सलग दोन वेळा हा मतदार संघ कधीच एका पक्षाकडे राहिला नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस च्या उदयानंतर महापालिकेत याच भागातून राष्ट्रवादीला आजतागायत अधिकाअधिक नगरसेवक मिळाले आहेत.

राष्ट्रवादीनेही दहा वर्षांच्या पालिकेच्या सत्ता काळात तब्बल पाच महापौर याच भागातून दिले आहेत. त्यामुळे या भागाचा चेहेरा बदलण्याचे काम खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीने केले आहे, असे बोलले जाते.
परंतु राज्य आणि केंद्राच्या निवडणुकीमध्ये या मतदार संघाने युतीलाही कौल दिला आहे. मागील तीन लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून युतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे. यंदाही लोकसभेचे शिवसेना भाजपचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना या मतदार संघातून साधारण 15 हजारांचे मताधिक्य मिळाले. परंतु मोदी लाट असताना हे मताधिक्य पाटील यांचे चवथ्या वेळी खासदार होण्याचे स्वप्न पुरे करू शकले नाही, हे देखील वास्तव आहे.

याला कारणही तसेच आहे. या मतदार संघामध्ये माळी आणि मराठा समाजाचे प्राबल्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे हे माळी समाजाचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना त्यांच्या अभिनेत्याच्याना प्रतिमेसोबतच जातीय राजकारणाचा फायदा झाला आणि ते आढळराव पाटील यांचे मताधिक्य थोपवण्यात यशस्वी ठरले.

लोकसभेचा हा निकाल भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांची डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे. अशातच येवलेवाडी तील विकास आराखडयातील कथित भ्रष्टाचारावरून मनसेचे इच्छुक उमेदवार नगरसेवक वसंत मोरे यांनी मागील वर्षभरापासून टिळेकर यांना जेरीस आणले आहे.
दुसरीकडे शिवसेना भाजप युतीमध्ये हडपसर मतदार संघ शिवसेनेला सोडावा अशी जोरदार मागणी शिवसेनेकडून होत आहे. भाजपचे शिर्षस्थ नेतृत्वही इंदापूर मतदार संघाच्या बदल्यात हडपसर हा शहरातील एकमेव मतदार संघ शिवसेनेला देण्यासाठी सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास टिळेकर यांचे गणित बिघडणार आहे. किंबहुना युतीची एक जागा गमावण्यापेक्षा दोन जागा टिकवण्याचे बेरजेचे गणित भाजप कडून मांडले जात आहे. परंतु या वाटाघाटी न झाल्यास टिळेकर हेच भाजपचे उमेदवार असतील यात शंका नाही.

शिवसेनेकडून नगरसेवक नाना भानगिरे आणि माजी आमदार महादेव बाबर तीव्र इच्छुक आहेत. भानगिरे यांनी महापालिका निवडणुकी मध्ये मिळवलेले यश आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या परिसरातून आढळराव पाटील यांना मिळवून दिलेले मताधिक्य, मितभाषी युवक या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर तीन वेळा नगरसेवक आणि एकवेळ आमदार असा अनुभव असलेले बाबर हे त्यांचे उमेदवरीतील स्पर्धक ठरणार आहेत.

आघाडीमध्ये हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे. माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून टिळेकर, भानगिरे किंवा बाबर यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून जातीय समीकरणाच्या आधारावर जगताप किंवा बनकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

वसंत मोरे ठरणार जायंट किलर !
मनसेचे वसंत मोरे यांनी वयक्तिक करिष्म्यावर हडपसर मतदार संघात दबदबा निर्माण केला आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सत्तेच्या जोरावर प्रभागाची मोडतोड करून टिळेकर यांनी पराभवासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करत मोरे यांनी टिळेकर यांच्या पराभवासाठी चंग बांधला आहे. मोरे हे देखील मनसे कडून मैदानात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने पर्यायाने मोरे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार केला आहे. त्यामुळे मोरे आणि राष्ट्रवादीचा प्रचार हा युतीच्या उमेद्वाराविरुद्ध राहणार हे स्पष्ट आहे. या तिरंगी लढतीमध्ये मतांचे विभाजन कसे होणार यावर विजयाचे गणित ठरणार, असे सध्यातरी दिसते.

Visit : policenama.com