‘खडक’ पोलिस ठाण्यातील DB पथकाचं ‘कडक’ काम ! ‘तडीपारा’व्दारे ‘तोडपाणी’ अन् 24 तास लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर सुटका – उकळले पैसे, पोलिस आयुक्तांकडे पुराव्यानिशी ‘तक्रार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तडीपारीची कारवाई झालेल्या गुंडानेच खडक पोलिसांच्या ‘डीबी’ पथकाला हाताशी धरून एका तरूणाला आर्म्स अ‍ॅक्टच्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचला. त्याला पोलिसांचा मार तर खाऊ घातलाच, पण त्याहून धक्कादायक म्हणजे, पोलिसांनी त्या तरूणाला पकडल्यानंतर ’24 तास लॉकअप’ मध्ये ठेवून त्याच्या बहिणीकडून ’15 हजार’ रुपये घेऊन त्याची सुटका केली. सोडून देताना त्याला कुठे वाच्यता केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली आहे. डीबीच्या सहायक निरीक्षक आणि त्यांचे दोन कर्मचार्‍यांनी हा प्रताप केला आहे. पैसे मागितल्याचे ‘रेकॉर्डींग’च तरूणाने पोलिस आयुक्तांकडे दिले आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी घोरपडी पेठ परिसरात राहणार्‍या 22 वर्षीय तरुणाने पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूण घोरपडी पेठेत राहण्यास आहे. त्याच्यावर एकही गुन्हा नाही. तो मिळेल ते कामे करतो. तो नोकरीच्या शोधात आहे. दरम्यान, याच परिसरात पोलिसांच्या अभिलेखावरील गुंड महिंद्र उर्फ वॉस्को कांबळे हाही राहतो. मात्र, त्याची अन खडक पोलीसांच्या डीबी पथकाची खास मैत्री आहे. त्याने या तरुणाला यापुर्वी मारहाण केली होती. परंतु, पिडीत तरुणाने याबाबत कोठेही तक्रार दिली नव्हती. तरीही त्याचा राग आरोपीच्या मनात होता.

गेल्या आठवड्यात संबंधीत तरूण दुपारी माशे आळी परिसरात थांबला होता. त्यावेळी गुंड महिंद्र उर्फ वॉस्को कांबळे तेथे आला. तरुणाकडे खून्नसने पाहिले. यावरून दोघांत शिवीगाळ झाली. त्यानंतर मात्र, तो ‘थांब तुला पोलिसांना सांगून जेलमध्येच टाकायला सांगतो,’ अशी धमकी देऊन गेला. काही वेळातच तो पोलीस कर्मचारी राहुल धोत्रे आणि बंटी कांबळे यांना घेऊन आला. त्या दोघांनी काही एक न विचारताच त्याच्या कानशीलात मारली. त्यानंतर येथील बंद असणार्‍या पाणी पुरीच्या गाड्यामधून दोन कोयते बाहेर काढले. पोलिसांनी या तरुणालाच अश्लील शिवीगाळ करत तुला केसमध्ये अडकवतो म्हणून मिठगंज पोलीस चौकीत नेले. त्याठिकाणीही गुंड कांबळे हाही बसलेला होता. त्याची पत्नीही तेथे होती. त्या दोघांनी तरुणाला पोलिसांसमोरच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तर, पोलिसांनी त्यांना काही एक न बोलताच या तरुणाला मारहाण केली. त्यानंतर एका तासाने या तरुणाला खडक पोलीस ठाण्यात नेले. तेथेे सहाय्यक निरीक्षक उमाजी राठोड यांच्यासमोर नेले.

पुन्हा तेथे या तरुणालाच जाब विचारत शिवीगाळ करण्यात आली. काही वेळाने राहुल धोत्रे आणि बंटी कांबळे यांनी संबंधित तरुणाच्या एका तडीपार मित्राला फोन करून 20 हजार द्यावे लागतील तरच तुझ्या मित्राला सोडू असे सांगितले. त्यानंतर या तडीपार मित्राने सेटलमेंटकरून 15 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, या तरुणाला पैसे देईपर्यंत पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्येच ठेवण्यात आले होते. जवळपास या तरुणाला 24 ते 28 तास लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. तरुणाच्या बहिणीने पैशांची जमाजमव करून दुसर्‍या दिवशी सायंकाळी पैसे पोहचते केल्यानंतर या तरुणाला सोडण्यात आले. त्याला सोडते वेळीही या पोलिसांनी कोणाला काही सांगितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली होती. तरुणाने सुटका झाल्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करून पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणाची तक्रार करून न्याय मागितला आहे.

मात्र, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती आणि एका सराईत गुंडाशी हातमिळवणी करून पोलिसच सर्वसामान्य तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देवून खंडण्या उकळू लागल्याने विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्त्वाचा मुद्दा 1 – 
पुणे पोलीसांकडून कागदोपत्री शेकडो गुन्हेगारांना तडीपार केले जाते. पण, काही दिवसांतच ते तडीपार पुन्हा शहरात सापडतात किंवा फिरताना दिसतात. या प्रकरणात तडीपारच पोलिसांसोबत सेटलमेंट करून प्रकरण मिटवित असल्याने पोलिसांच्या तडीपारीत किती गांभीर्य असते अन् किती पोलिसांचा गुन्हेगारांवर किती वचक आहे, हे स्पष्ट दिसू लागले आहे.

महत्त्वाचा मुद्दा 2 – 

एकीकडे तडीपार सेटलमेंट करत असताना दुसरीकडे तडीपारीची कारवाई झालेला अन् पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार पोलिसांच्या डीबी पथकाला हाताशी धरून खुन्नस असणार्‍या तरूणाला अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे धक्कादायक वास्तवही यामुळे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांचे डीबी पथक नेमकी काय कामगिरी करतात हेही यावरून दिसत आहे.