यंदा पालखी दर्शनाशिवाय भक्त भुकेले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या महामारीपासून लाखो लोकांचे प्राण वाचण्यासाठी घेतला गेलेला हा निर्णय छापा-काट्यासारखा वाटत आहे. विठ्ठल भक्तांची आणि हजारो लहान-थोर लोकांचे “पोट-पाणी” असणारी “वारी” यंदा नाही होणार नाही, त्यामुळे मन “काट्यानी” बोचल्यासारखं होतंय. मात्र, त्याला इलाज नाही. देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंत 15 दिवस मजल दरमजल मुक्कामाच्या ठिकाणी धडपडत, पोलिसांची नजर चुकवून गर्दीत घुसून दर्शन घेणारे, तर दुसरीकडे वृद्धांना हाताला धरून दर्शन घडविणारी मंडळीही दिसणार नाहीत.

होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, असे संत तुकाराम महाराजांनी पंढरपूरच्या वारीसाठी म्हटले आहे. वारीची महती अगाध आहे. पंढरीच्या वारीची लीला सर्वदूर पोहोचली आहे. गरिबांची काशी म्हणून पंढरपूरची ख्याती आहे. पंढरीच्या वाळवंटात क्षणभर बसून यावे म्हणतो, असे म्हणत वारकरी भक्त दरवर्षी वारीला उत्साहाने जातात. वारीमध्ये आजार-बिजार काही नाही, सर्व समान म्हणून एकमेकांची सेवाही करतात, ते वारकरी म्हणून ओळखले जातात.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रांगोळ्या, उभे, गोल रिंगण नाही, आकाशात फडकणाऱ्या भगव्या पताका दिसणार नाहीत. वारकरी भक्तांना अन्नदान करण्याची संधीही हुकली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सोहळ्याचा थाट खेडेगावातील आबालवृद्धांना पाहता येणार नाही. ग्यानबा-तुकाराम, विठू माऊली असा जयघोषाचा खंड पडणार आहे. माता-माऊलींची सेवा करणारा डॉक्टर वर्ग कोरोना विषाणूवर मात करणाऱ्यांवर उपचार करीत आहेत, हीसुद्धा विठुरायांचीच सेवा आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी सांगितले.

सुमारे 700 वर्षांपूर्वी हातात सर्परूपी वाद्या घेऊन वाघावर बसून “माऊलींच्या” भेटीला येत असलेल्या “चांगदेवांकडे” बघून छोट्या मुक्ताईनं माऊलींना विचारलं होतं. “ज्ञाना. एवढ्या मोठ्ठया सत्पुरुषाला भेटायला, आपण रे कसं जायचं?” त्यावेळी “माऊलींनी” चक्क निर्जीव भिंत चालविली आणि हरली चांगयाची भ्रांती, अशी सकारात्मक ऊर्जेची भिंत चालवून येणाऱ्या नकारात्मकतेला सगूण साकारामध्ये वळवले. नकारात्मकतेची भ्रांती दूर केली होती.

संतश्रेष्ठ माऊलींप्रमाणेच सर्वच संतांनी आपल्या अवतारकार्यातून समाजमानातील नकारात्मकता नष्ट करून भक्तीचा मळा फुलविला. मात्र, आता सत्ताधाऱ्यांचा विसर पडतो. कारण ते समाजाचा “चेहरा” बदलण्याचा प्रयत्न करतात. पण संतांना विसरता येत नाही. ते समाजाचं “मन” बदलण्याचा प्रयत्न करतात!” म्हणूनच शेकडो वर्षे झाली तरी अगणित संतांचा “पालखी सोहळा” अव्याहतपणे अधिक उत्साहाने सुरू आहे.!

“आषाढी वारीचा” पायी पालखी सोहळा यावर्षीपुरता रद्द झाला! फक्त काही मोजक्याच मंडळींबरोबर काही संतांच्या पादुका त्या वेळच्या परिस्थितीनुसार उपलब्ध वाहनातून श्रीक्षेत्र पंढरपूरला आणून “आषाढी वारी” साजरी करायची. असा “तोडगा” काढणारा शासन निर्णय जाहीर झाला आणि मन या निर्णयाच्या बाबतीत “छापा” की “काटा”..? या संभ्रमात जाऊन बसलं.

आषाढी वारी सुरू झाल्यापासून चुरमुरे- शेंगदाणे- फुटाणे- बत्तासे- हळद- कुंकू- अष्टगंध- बुक्क्याच्या पुड्या करणाऱ्यापासून ते रस्त्यावर बसून कोळश्याची फक्की टाकून रांगोळीची कलाकुसर काढणारे किंवा हातात काळ्या, तांबड्या, केशरी गोफांच्या गाठी घेऊन दोन-पाच रुपयांना विकणारे नदीच्या वाळवंटापासून प्रदक्षिणा मार्गावर कपाळाला गंध लावत फिरणाऱ्या किरट्या पोरापासून ते लाखोंची उलाढाल करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचीच गणितं बिघडली आहेत. किती किती लोकांची म्हणून यादी देणार, हा प्रश्न आहे. पंढरपूरच्या हिशेबातील देण्या-पाण्याची खरेदी-विक्रीची सुरुवातच जणू “वारीनंतर बघू” किंवा “पुढच्या वारीत बघू” अशी होतेय.

परंपरेची “वारी” यंदा नाही. मुक्कामाच्या ठिकाणचा सोहळा नाही, दर्शनासाठी देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंत रस्त्याकाठची आणि आसपासची मंडळीसुद्धा दिसणार नाहीत. टाळ-मृदंगाच्या गजरातील दिंड्या नाहीत, भजन-कीर्तन, भारूड, असा काहीसा भव्यदिव्य साजही नाही. लाखोंच्या खांद्यावर झळकणाऱ्या त्या पताका यंदा नाहीत. “ग्यानबा-तुकाराम”च्या जयघोषातील तुडुंब गर्दीने भरलेल्या पालख्यासुद्धा पाहायला मिळणार नाहीत, कारण यंदा पालख्याच येणार नाहीत. मात्र पादुका हवाईमाम्रेग पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत. मात्र, दर्शन घेता येणार नाही, ही सल पांडुरंग भक्तांना कायम बोचत राहणार आहे.

आता वारी सुरू का….

दहावी-बारावीतील बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्यांना आषाढी-कार्तिकी म्हणजे मार्च-ऑक्टोबरमध्ये परीक्षा द्यायला लागतात. काहींच्या वाट्या या परीक्षा आल्या, त्यातून काही सुटले तर काही शाळाच नको म्हणून मार्गच बदलून टाकला. एक दोन वर्षे नाही पास झाला तर “किती वर्षे वाऱ्या करायच्या?” हा परवलीचा शब्द! “जा एवढं काम कर मग तुला वारी फिरवून आणीन” या आमिषावर तर कित्येक आईबापांनी पोरांना वळणं लावली, त्यांच्याकडून कामं करून घेतली. इतकी “वारी” पंढरपूरकरांच्या अंगात भिनलीय…!