‘वारंवार’ नियमांचे उल्लंघन करून दंड न भरणाऱ्या ‘टॉप 100’ वाहन चालकांच्या घरी जाऊन कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंड न भरणाऱ्या टॉप 100 वाहन चालकांच्या घरी जाऊन कारवाई करावी. त्याचा अहवाल तातडीने आयुक्तांना पाठवावा, असा आदेश वाहतूक पोलीस नियोजन विभागाने प्रत्येक वाहतूक डिव्हीजनला दिल्याने, आज दिवसभर वाहतूक पोलीस चौकांमध्ये वाहतूक नियोजनाऐवजी वाहन चालकांचे पत्ते शोधत गल्ली बोळात फिरत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

शहरातील वाहतूक कोंडीसाठी नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक हा एक प्रमुख घटक आहे. अशा वाहन चालकांवर सीसीटीव्ही तसेच ट्रॅफिक अ‍ॅप च्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. यामध्ये वाहनचालकांचे वाहन क्रमांक घेऊन त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी मागील काही महिन्यात बेशिस्त वाहनचालकांना कोट्यवधींचा दंड आकारला आहे. परंतु यानंतरही दंडाची वसुली कमी होत नसल्याने वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवून अधिकाधिक दंड केलेली वाहने अडवून दंड वसूल करण्यात येतो. परंतु यानंतरही सर्वसामान्य कर्मचारी, विद्यार्थी, महिला हजारोच्या पटीत दंड भरण्यात असमर्थ ठरतात. त्यामुळे दंडाचा आकडा वाढत चालला आहे.

यावर क्लृप्ती म्हणून मागील आठवड्यात वाहतूक पोलिसांनी सातत्याने नियमांचे उल्लंघन करताना आढळलेल्या टॉप 100 वाहनांचे क्रमांक आणि वाहन मालकांचे नाव असलेली यादी प्रसिद्ध केली आहे. आज आपण त्यापुढे जाऊन प्रत्येक वाहतूक डिव्हीजनला त्यांच्या हद्दीतील नियमाचे उल्लंघन करणाऱ्या टॉप 100 वाहन चालकांची यादी पाठवत संध्याकाळपर्यंत त्या वाहन चालकांच्या घरी जाऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच या कारवाईचा अहवाल तातडीने वाहतूक विभागाला मेलद्वारे कळविण्याचे सूचित केले आहे.

वाहतूक शाखेच्या नियोजन विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामध्ये आयुक्तांना माहिती सादर करायची असल्याने विशेष पथक स्थापन करावे. ही माहिती आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाठवावी. तसेच कारवाईचा तपशील प्रत्येक 3 तासांनी ट्रॅफिक कंट्रोलला कळवावा असे सांगण्यात आले. संध्याकाळ पर्यंत किती जणांवर कारवाई झाली हे मात्र कळू शकले नाही. मात्र वाहतूक पोलिसांची विशेष पथक मात्र झोपडपट्टी, सोसायट्या आणि गल्ली बोळातून वाहन चालकांचा शोध घेताना मात्र दिसून आली.