Pune News : 5 लाखाचे लाच प्रकरण ! पोलीस निरीक्षक, API कदम आणि कर्मचारी दौंडकर यांच्या अडचणीत कमालीची वाढ, जाणून घ्या कोर्टात काय झालं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्या प्रकरणात या तिघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. न्यायालयाने या तिघांना आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद दौलत चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल प्रभाकर कदम व कर्मचारी महेश विनायक दौंडकर अशी न्यायालयीन कोठडी झालेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या मामावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अटक देखील झाली आहे. त्यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. या गुन्ह्याच्या तपासी अंमलदार यांचे कोर्टात म्हणणे सादर करण्यासाठी लोकसेवकांनी तक्रारदार यांच्याकडे 5 लाखांची मागणी केली होती. त्यापैकी अडीच लाख रुपये तिघांनी आधीच घेतले. मात्र, कोर्टाने तक्रारदार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर तक्रारदार यांनी सेशन कोर्टात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला. त्यावेळी कोर्टात म्हणणे देण्यासाठी पुन्हा उर्वरित अडीच लाख रुपयांची मागणी या तिघांनी केली. यावेळी तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने पाच दिवसांपूर्वी (शनिवारी) सापळा कारवाई करत तक्रारदार यांच्याकडून 1 लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार तिघांची येरवडा कारागृहात रवानगी झाली आहे.