Pune News : मारणे गँगच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू असतानाच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा मोर्चा गँगस्टर निलेश घायवळ टोळीकडे, खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कूविख्यात गुन्हेगार निलेश घायवळ याच्या टोळीचा मुख्य संतोष धुमाळ आणि इतरांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धुमाळसह दोघांना अटक केली आहे. त्यामुळे कूविख्यात निलेश घायवळ अडचणीत येण्याची शक्यता असून, त्याच्याकडे देखील तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी ‘भाऊं’च्या रॅलीसाठी गाडी जबरदस्तीने नेल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी संतोष आनंद धुमाळ (वय 38, रा. भुगाव, ता. मुळशी) व मुसाब उर्फ मुसा इलाही शेख (वय 29, कोथरुड) यांना अटक केली आहे. तर कुणाल कंधारे, अक्षय गोगावले, विपुल माझीरे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 32 वर्षीय गाड्या खरेदी-विक्री व जिम चालकाने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

माहितीनुसार, फिर्यादी यांचा गाड्या दुरुस्ती तसेच विक्री खरेदीचा व्यवसाय आहे. त्यांचे डावी भुसारी कॉलनी येथे गॅरेज देखील आहे. त्यांच्या गॅरेजला महिंद्रा पिकअप कार पार्क केली होती. त्या दरम्यान गुन्हेगार संतोष धुमाळच्या सांगण्यावरून आरोपींनी फिर्यादीला चॉपरचा धाक दाखवून तसेच शिवीगाळ करत महिंद्रा गाडी जबरदस्तीने नेली.

दरम्यान, फिर्यादी याने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी संतोष आणि त्याच्या साथीदार मुसा याला पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विनोद साळुंखे, प्रदीप शितोळे, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ व प्रदीप गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.