Pune News : भरकटलेले सांबर घुसले कंपनीत, वनविभागाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश

आंबेठाण : पोलीसनामा ऑनलाईन – भरकटलेल्या सांबराला 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षितपणे ताब्यात घेऊन करंजविहिरे येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात वनविभागाच्या बचाव पथकाला आले. चाकण औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी येथील जीई कंपनीत बुधवारी (दि. 23) भरकटलेले सांबर घुसले होते. कंपनीस आरसीसी वॉल कम्पाउंड व त्यावर तारेचे कुंपण असल्याने सांबरास बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही. त्यामुळे कंपनीच्या परिसरात ते घुटमळत असल्याचे सुरक्षारक्षकाने कंपनीच्या वरिष्ठांना सांगितले. त्यानंतर वरीष्ठांनी चाकण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. वनविभागाच्या अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्य़ंत येथे बघ्याची मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे आणि कंपनीत सुरु असलेल्या मशनरीमुळे सांबरास धोका होऊ शकतो, यामुळे वन विभागाच्या बचाव पथकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने नर सांबरास 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षितपणे ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

उपवन संरक्षक जुन्नर जयारामे गौडा,सहाय्यक वनसंरक्षक एस.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. निखिल बनगर,पशुवैद्यकीय अधिकारी कोकणे,चाकण वनपरिक्षेत्राचे योगेश महाजन,जीई इंडिया कंपनीचे अधिकारी तसेच मनोहर शेवकरी,अतुल सवाखंडे आदींच्या मदतीने सांबरास पकडून वनविभागाच्या हद्दीत सोडण्यात आले.