Pune News : पुण्यात ‘पॉलिकॅब’नंतर आता ‘हॉकिन्स’चे बनावट कुकर बनविणार्‍यांचा पर्दाफाश ! दिलीप कोठारी अन् विनोद जैनविरूध्द गुन्हा, 17 लाखाचे 1284 नग जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील ब्रँडेड कंपन्यांचे पार्ट आणि वस्तू तयार करत त्याच्या विक्रीचे जाळे पुणे पोलिसांकडून उघडकीस आणण्यात येत असून पॉलिकॅबनंतर आता नामांकित अश्या हॉकिंन्स कंपनीचे बनावट कुकर तयार करून विक्री करणाऱ्या दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली आहे. दुकानातून तबल साडे सतरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार देखील मध्यवस्तीतच सुरू होता.

याप्रकरणी दिलीप फुलचंद कोठारी (वय 56, रा. मंगळवार पेठ) व विनोद तखतमल जैन (वय 61, रा. शुक्रवार पेठ) यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अवैध धंदे, गुटखा आणि बनावट वस्तू प्रकरण मोठ्या तेजीत सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कडक कारवाया करत हे प्रकार समोर आणले आहेत. गुटखा प्रकरणाचे पाळेमुळे खोदले. यानंतर त्यातले हवाला प्रकरण समोर आणले. तर दुसरी मोठी कारवाई ही पॉलिकॅब या बड्या कंपनीचे बनावट वायर आणि वस्तू तयार करणारे मोठे जाळे उघडकीस आणले होते.

हे प्रकरण सुरू असतानाच आयुक्त गुप्ता यांना माहिती मिळाली की, मध्यवस्तीत हॉकिंन्स या नामांकित कंपनीचे बनावट कुकर तयार करून त्याची विक्री केली जात आहे. त्यानुसार ही माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला देण्यात आली आणि त्याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अचानक शुक्रवार पेठेतील टी. एफ. कोठारी या दुकानात आणि फुरसुंगी परिसरात असलेल्या गोडाऊनमधील श्री. शंखेश्वर युटेन्सिल्स अँड अप्लायन्सेस प्रा. ली. येथे एकाच वेळी छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांना मॅगीसून प्रेशर कुकरचे 1 हजार 284 नग असा एकूण 17 लाख 45 हजार 955 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच नवीन माल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे 5 हजार लोगो आणि कागदी रॅपर मिळाले आहेत. त्यावर हॉकिंन्स असे नाव असलेले हे स्टिकर आहेत. त्यानुसार पोलिसांनी कॉपी राईटचा गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, उपनिरीक्षक श्रीधर खडके, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अण्णा माने, हणमंत कांबळे, मनीषा पुकाळे, नीलम शिंदे, संदीप कोळगे, संतोष भांडवलकर, प्रफुल्ल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.