Pune News : यशस्वी होण्याकरीता वय व परिस्थितीच्या अडचणी गौण, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांचे मत

पुणे (pune) : यशस्वी व्हावे असे जेव्हा वाटते, तेव्हाच जीवनाचा खरा प्रवास सुरु होतो. यशस्वी होण्याची इच्छा मनात असेल तर, वय, परिस्थिती या अडचणी गौण आहेत. शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसते. रात्र शाळेत शिकणारी मुले ही दुहेरी भूमिका निभावत असतात. स्वत:ची आणि घरची जबाबदारी घेत स्वत:चे अस्तित्व समाजात सिद्ध करण्यासाठी ते धडपडत असतात. त्यामुळे अशक्य असे जगात काहीच नाही, असे मत पुणे (pune) विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी व्यक्त केले.

पूना नाईट हायस्कूल आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनिअर कॉलेज पुणे यांच्या वतीने गरजू विदयार्थ्यांना आर्थिक मदत, शालेय साहित्याचे वाटप आणि शिक्षण खात्यातील अधिका-यांचा सत्कार संस्थेच्या सभागृहात करण्यात आला. यावेळी सहाय्यक शिक्षण उपसंचालक मीना शेंडकर, नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके, सरस्वती मंदिर संस्थेचे संचालक प्रा. विनायक आंबेकर, स्कूल कमिटी चेअरमन संजय जोशी, प्राचार्य अविनाश ताकवले यावेळी उपस्थित होते.

मीना शेंडकर म्हणाल्या, रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांचे काही कारणामुळे शिक्षण थांबले तरी प्रयत्न करुन मुख्य प्रवाहात येत त्यांचे शिक्षण सुरु झाले आहे. काम करीत शिकत राहिल्याने आपण अनुभवाने अधिक समृद्ध होतो. शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करुन पुढे जा, असेही त्यांनी सांगितले.

प्रा. विनायक आंबेकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १० वी आणि १२ वीच्या शालाबाह्य व गरजू विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी उपयुक्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दिवसा कष्ट आणि रात्री शिक्षण याची समाजाला कदर आहे. त्यामुळे शिकण्याची इच्छा असणाºयांना समाजाकडून मदतीचा हात मिळतो. मागील वर्षात अनेक अडचणी आल्या. मात्र, ज्यांना शिकण्याची इच्छा या एकाच निकषावर संस्थेत प्रवेश देण्यात येत आहे.

प्रा. अविनाश ताकवले म्हणाले, रात्र शाळेतील शिक्षकांचे काम इतर शिक्षकांपेक्षा वेगळे आहे. परंतु २०१७ सालापासून उच्चमाध्यमिक शिक्षकांना मान्यता नसल्याने वेतन मिळत नसल्याच्या अडचणी आहेत. त्या समजून घेत शासनाने याकडे लक्ष घालावे, असेही त्यांनी सांगितले. दिलीप लंके, उमेश सरगर, विनोद महाजन, स्फूर्ती देशपांडे, अपर्णा जाधव, विजया दिघे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सुनील मते यांनी सूत्रसंचालन केले.