धीरज घाटे यांची भाजपच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर प्रभारी धीरज घाटे यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी (सचिव) नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ही नियुक्ती जाहीर केली.

धीरज घाटे यांच्या नवी पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. धीरज यांना भविष्यात आणखी मोठ्या जबाबदा-या पार पाडायच्या आहेत. त्यासाठी त्यांनी सज्ज रहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. धीरज यांचे हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी हक्काचे घर ठरावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

धीरज यांनी परभणी आणि बीड येथे चार वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले आहे. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर त्यांनी पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे काम सुरू केले. संघटन सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली. नंतरच्या काळात दोनवेळा पुणे शहर सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते पुणे शहर भाजपा प्रभारी आहेत.

2007 आणि 2012 मध्ये वहिनी सौ. मनिषा धनंजय घाटे यांना नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर 2017 मध्ये धीरज घाटे हे प्रभाग क्र. 29 मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पक्षाने पुणे महानगरपालिकेत सभागृह नेता ही जबाबदारी सोपविण्यात आली. वर्षभरानंतर त्यांना पुणे शहर प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

विचारांवर श्रद्धा, पक्षावर निष्ठा आणि कार्यकर्त्यांचे संघटन ही धीरज यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. साने गुरूजी तरुण मंडळ आणि हिंदूगर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहेत. बीडमधील दुष्काळ, आंबिल ओढा पूर आणि कालवा फुटीदरम्यान त्यांनी मोठे मदतकार्य केले. कोरोना काळात त्यांनी पंधरा ते अठरा हजार कुटुंबांना काही महिने शिधा पुरविण्यासह अनेक क्षेत्रात त्यांनी मोठे मदतकार्य केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.