Pune News : गावठी पिस्टल बाळगणारा तरुण गजाआड

सासवड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई जेजुरी नाका परिसरात करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 85 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गौरव उर्फ माया भाई बाळासो कामथे (वय- 22 रा. खळद गाव ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जेजुरी नाका परिसरात एक इसम आपल्या जवळ गावठी बनावटीची पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका मोपेड गाडीवर फिरणाऱ्या कामथेला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या आत पाठीमागील बाजूस कंबरेला एक लोखंडी गावठी पिस्तूल आढळून आली. पोलिसांनी पिस्तूल तपासले असता पिस्तुलाच्या मॅगझिनमध्ये दोन जीवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त केली आहे. आरोपीला सासवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, पोलीस नाईक विजय कांचन, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, अभिजित एकशिंगे दगडू विरकर यांच्या पथकाने केली.