Pune News : दुबई प्रवासासाठी बनावट पासपोर्ट व आधारकार्ड तयार करणाऱ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  बनावट कागदपत्रांआधारे महिलेचे आधारकार्ड तयार करून त्याआधारे पासपोर्ट मिळवून देणाऱ्यास विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. सूर्यकुमार सुब्रम्हण्यम बलजी (वय 50, रा. कुरमन्न पालेम, राज्य आंध्रप्रदेश) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणात 22 वर्षीय महिलेला यापूर्वीच अटक करण्यात आली असून ती सध्या जामिनावर आहे.
तीन डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 22 वर्षीय महिलेने आरोपीच्या मदतीने दासरी स्वप्ना या नावाने बनावट आधारकार्ड तयार केले. आधारकार्ड तसेच बनावट कागदपत्रे तिने पासपोर्ट कार्यालयात सादर करत पासपोर्ट मिळविला. त्या आधारे तिने नोकरीसाठी दुबईचा व्हिसा मिळविला. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथून दुबईला गेली. तर, 3 डिसेंबर रोजी दुबईतून पुण्यात आली. त्यावेळी लोहगाव विमानतळावर तिला अटक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात सूर्यकुमार यास अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. सूर्यकुमार याने बनावट आधारकार्ड व पासपोर्ट कोठे तयार केले आहे याचा तपास करायचा आहे. त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का? तसेच त्याने याप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास करायचा असल्याने त्याला पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करीत आरोपीस 15 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बलजी याच्याकडून पाच हजार रुपयांचा एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एम. एस. पाठक करीत आहेत.