Pune News : कूविख्यात गजानन मारणेचे स्वागत केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा आशिष साबळेंचा दावा, दिलं पोलिस आयुक्तांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कूविख्यात गुंड गजानन मारणेचे स्वागत केल्याप्रकरणी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे आशिष साबळे यांना गुन्हे शाखेने अटक केल्याप्रकरणी आता साबळे यांनी पुणे पोलिस आयुक्त यांना निवेदन देत खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा केला आहे. तर कोथरुड पोलीस 150 आरोपी दाखवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप देखील केला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

कूविख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा ते पुणे अशी रॅली प्रकरण सध्या पुणे पोलीस दलात गाजत आहे. गुन्हे शाखा आणि कोथरुड पोलीस त्या दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करत आहेत. त्यात दाखवलेले 150 जण आता शोधले जात आहेत. त्यानुसार अनेकांना अटक करत महागड्या गाड्या देखील जप्त केल्या आहेत.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी मनसेचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे यांना देखील गुन्हे शाखेने अटक केली आणि कोथरुड पोलोसांचे ताब्यात दिले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. आता त्यानी न्याय मिळावा म्हणून थेट पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे. आपण पुरावे दिले, त्याचा तपास केला का, हे देखील पहावे असे म्हटले आहे.

मला, गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याने फोन करून मला खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी बोलावले आहे, असा निरोप दिला. त्यामुळे मी पाटील यांना संपर्क केला. यावेळी त्यांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खंडणी पथक कार्यालयात बोलावले असल्याचे सांगितले. त्यानुसार आपण संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो देखील, त्यावेळी त्यांनी मारणे याच्याशी काय संबंध असा प्रश्न केला. त्यावर आपण त्यांना गजानन मारणे यांच्या पत्नी आमच्या पक्षाच्या पदाधिकारी असून, पक्षाच्या कार्यक्रमात एकदोन वेळा भेट झाली आहे, इतकीच काय ती ओळख असल्याचे सांगितले. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी म्हणजे ज्या दिवशी गजानन मारणे यांची सुटका झाली. त्यादिवशी मी आणि गजानन मारणे याचे वकील व कौटुंबिक स्नेही असल्याने आपण त्यांच्यासोबत जेलला गेलो. तेथे जेल बाहेर पेटीत भेट झाली. त्यानंतर आम्ही सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास वकिलांसोबत वापस निघालो. आम्ही एका हॉटेलात जेवण करण्यासाठी थांबलो. पण त्याच वेळी जेलमधून आम्हाला बॉण्ड बाबत फोन आल्याने परत गेलो. तेथे काम संपल्यानंतर मारणे याने वकिलांना धन्यवाद केले. त्यानंतर मला नमस्कार करून पक्षाचे काम कसे सुरू आहे असे विचारले. आपण छान सुरू असल्याचे सांगितले आणि आम्ही परत निघालो. इतकाच आमचा काय तो संबंध, असे साबळे यांनी सांगितले. तरी देखील मला पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली आहे. तरी आपण मी गजानन मारणे यांच्या रॅलीत किंवा गणपती आरती करताना किंवा रॅलीत सहभागी होतो का हे तपासावे अशी मागणी साबळे यांनी आता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे.

तर कोथरुड पोलीस 150 गुन्हेगार दाखवण्यासाठी दबाव टाकत आहेत, असा आरोपही केला आहे.
यावेळी त्यांनी साबळे यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप लावले. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल करताना जी तत्परता दाखवली तीच तत्परता वनमंत्री राठोड प्रकरणात हे दाखवा ? पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलीस गप्प का ? असा सवाल पत्राद्वारे विचारला. या पत्राची एक प्रत राज ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही पाठविण्यात आली आहे.