Pune News : क्रिडापटूंचा कार्यक्रम दोन दिवसांवर ‘क्रिडा समितीला’ माहितीच नाही; समितीचे उपाध्यक्ष नगरसेवक चोरबेले यांचे आयुक्तांना खरमरीत पत्र

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्यावतीने क्रिडापटूंचा गौरव आणि शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम अवघ्या दोनच दिवसांनी होणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमाची माहिती महापालिकेच्या ‘क्रिडा समिती’लाच नसल्याचे समोर आले आहे. विशेष असे की आज क्रिडा समितीच्या बैठकीकडेही अधिकार्‍यांनी पाठ फिरविल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी बैठक तहकुब केली.

क्रिडा समितीचे उपाध्यक्ष प्रविण चोरबेले यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना खरमरीत पत्र पाठवून संबधित अधिकार्‍यांना कडक तंबी द्यावी अशी मागणी केली आहे. महापालिकेच्यावतीने १२ फेब्रुवारी रोजी विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आजी माजी दिग्गज खेळाडूंना गोैरविण्यात येणार असून खेळाडूंना शिष्यवृत्तीचेही वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, भाजपचे प्रदेशअध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहाणार आहेत. क्रिडा विषयक एवढा मोठा कार्यक्रम असतानाही क्रिडा समितीच्या सदस्यांना या कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही. तसेच आज क्रिडा समितीची बैठक असताना अधिकारी बैठकीकडे फिरकले नाहीत. आजच्या बैठकीपुढे वर्ल्ड टूर टेनिस चॅम्पियन स्पर्धेसंबधित विषय चर्चेला होते. मात्र, अधिकारी ऑनलाईन अथवा ऑफलाईनही उपस्थित न राहील्याने बैठक तहकूब करावी लागली.

या दोन्ही बाबी गंभीर असून आयुक्तांनी यापुढे क्रिडा संबधित कार्यक्रमांची माहिती समितीला आगाउ देणे तसेच बैठकांना अधिकार्‍यांना उपस्थित राहाणे बंधनकारक करावे, अशी मागणी चोरबेले यांनी केले आहे.