Pune News : अपंग आरोपीकडून चक्क पोलिस ठाण्यातच कर्मचार्‍याच्या अंगावर इनोव्हा घालण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच कोर्टाचे वॉरंट असलेल्या आरोपीनेच येरवडा पोलिस ठाण्याच्या आवारातून कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालत पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

उत्कर्ष पाटील (रा.नीलांजली सोसायटी, कल्याणी नगर पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विनायक उलगा मुधोळकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अंदमानातील पोर्ट ब्लेअर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे आरोपी उत्कर्ष पाटील यांच्या नावाने वॉरंट आले होते. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी येरवडा पोलिसांचं कर्मचारी त्याला घेऊन आले होते. पोलीस ठाण्याच्या आत मध्ये वरिष्ठ कर्मचारी आरोपीला घेऊन जाण्यास संबंधित प्रक्रिया पार पाडत होते. आरोपी हा एका हाताने अपंग आहे. दरम्यान थंडीमुळे हात दुखत असल्यामूळे आपल्या इनोव्हा गाडी मधील हिटरने ऊब घेण्याचा बहाणा करून तो गाडीत शिरला. त्यानंतर त्या ठिकाणी उभे असलेले सहायक पोलिस फौजदार मोरे यांना धक्का देऊन खाली पाडले आणि इनोव्हा गाडी सुरू करून फिर्यादीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पळून गेला आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे करीत आहेत.