Pune News : दस्त नोंदणीत जमीन मालकाचा मृत्यू झाल्याचे दाखवून जमीन बळकविण्याचा प्रयत्न, 3 जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमीन बळकावण्यासाठी दस्तनोंदणीमध्ये जमीन मालकाचा मृत्यू दाखवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमीन मालकाचा मृत्यू झाल्याचे भासवून जमीन हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाराम पुणेकर, मीना पुणेकर, चेतन पुणेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अविनाश रामभाऊ कानगुडे (वय 44,रा. मुळशी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी डिसेंबर 2019 मध्ये बळवंत दातार यांच्याकडून 16 हजार चौरस फुट जागा खरेदी केली होती. याबाबत कुलमुखत्यार दस्त त्यांनी हवेली उपनिबंधक कार्यालयात नोंद केली होती.

दरम्यान, दातार यांनी 1984 मध्ये 10 हजार चौरस फुट जागा राजाराम पुणेकर यांना 99 वर्षाच्या भाडेकराराने दिली. मात्र, 2005 पासून पुणेकर यांनी दातार यांना ठरल्याप्रमाणे भाडे दिले नाही. एवढेच नाही तर पुणेकर यांनी दातार यांच्या 7 हजार चौरस फुटावर अतिक्रमण करुन त्याठिकाणी बांधकाम केले. यामुळे दातार यांनी पुणेकर यांच्या सोबत झालेला करार रद्द करत असल्याची नोटीस 2019 मध्ये पाठवली.

नोटिसीला उत्तर देताना पुणेकर यांनी 20 हजार चौरस फुट जागा ताब्यात असल्याचे म्हटले होते. दातार यांना आपली फसणवूक झाल्याचे निदर्शनास आले होते. चौकशीत 23 एप्रिल 2008 मध्ये राजाराम पुणेकर यांनी हवेली उपनिबंधक कार्यालयात बनावट मजकुराचे घोषणापत्र सादर करुन यामध्ये बळवंत दातार यांचा मृत्यू झाल्याचे दाखवले. तसेच एकतर्फी दस्त नोंदणी केली. बळवंत दातार हे हयात असताना पुणेकर यांनी बनावट घोषणापत्राच्या सहाय्याने जमीन बळवकवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी करत आहेत.