Pune News : ‘तो’ साथीदारांसह महिलांच्या शौच्छालयाच्या परिसरात बसला होता पत्ते खळेत, हटकल्यावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने हल्ला, 7 वर्षाची मुलगी जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   महिलांच्या सार्वजनिक शौच्छालयाच्या परिसरात पत्ते खेळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आणि त्याच्यासोबतच्या व्यक्तींना हाटकल्यानंतर चौघांनी एकावर घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने वार केले. यात 7 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. वानवडीत हा प्रकार घडला आहे.

करण सुंदरलाल वाल्मिकी (रा. रामटेकडी), पापा वाघेला आणि साहिल उर्फ लड्डू वाघेला या तिघांना अटक केली आहे. तर रफिक शेख हा पसार झाला असून, याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूरज पाटोळे यांच्या पत्नीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुटुंबासह रामटेकडी येथील मगरीनभाईची चाळ येथे राहण्यास आहेत. दरम्यान आरोपी करणं वाल्मिकी हा सराईत गुन्हेगार आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. तो आणि त्याच्यासोबत आरोपी हे येथील महिलांच्या सार्वजनिक शौच्छालयाच्या परिसरात पत्ते खेळत बसले होते. यावेळी सूरज पाटोळे हे याठिकाणी महिला येतात, इथे पत्ते खेळू नका, असे म्हणत त्यांना हटकले. याचा राग आरोपींच्या मनात आला होता. यावेळी आरोपी हे हातात तीक्ष्ण हत्यारे घेऊन फिर्यादी यांच्या घरात घुसले. तसेच त्यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावर फिर्यादी व त्यांची मुलगी घरीच होते. फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांनी सपासप वार केले. यावेळी 7 वर्षांची मुलगी मध्ये आली. आरोपींकडून तिच्या देखील गालावर वार झाला. यात तिचा गाल फाटला आहे. फिर्यादी यांचे पती व त्यांची 7 वर्षांची मुलगी यात गंभीर जखमी झाली आहे. माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फरार झालेल्या तिघांना अटक केली. तर एकजण पसार झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पोटवडे हे करत आहेत.