Pune News : दारू आणि पाण्यासाठी पैसे न दिल्याने चौघांकडून सपासप वार, जनता वसाहतीतील घटना

पुणे (Pune) : पोलिसनामा ऑनलाइन – दारू आणि पाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यावरून चौघांनी शस्त्राने सपासप वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना जनता वसाहतीत घडली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर तिघे फरार झाले आहेत.

राकेश दत्ता आवळे (वय 26, रा. जय भवानी नगर, जनता वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत भीमराव बंजारा (वय 29, जनता वसाहत) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मेव्हणा प्रकाश यांच्यासोबत येथील शक्ती सुपर मार्केट येथे आले होते. त्यावेळी राकेश व त्याचे तीन साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना पाण्याची बॉटल आणि दारूसाठी पैसे मागितले. पण फिर्यादी यांनी ते देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मेव्हणा यांच्यावर लोखंडी रॉड, तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत दगडाने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपी पसार झाले. जनता वसाहत अचानक झालेल्या राड्यात चांगलाच गोंधळ उडाला होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच एकाला पकडले. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.