Pune News : ‘मी इथला भाई, मला खुन्नस देतो; आज त्याचा खेळ खल्लास करू ! 6 जणांच्या टोळक्याकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  इथला भाई असताना मला खुन्नस देत आसल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याचा प्रकार घडला आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

संकेत आनंद तारू, केतन संजय चव्हाण, हर्षद पवार, नयन ठीले, फय्याज शेख, उदय लोखंडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी रहिम अल्ताफ कुरेशी (वय 23) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे मित्रासह गप्पा मारत थांबले होते. यावेळी आरोपी संकेत हा त्याठिकाणी आला. तसेच त्याने फिर्यादी तरुणाला “मी इथला भाई असताना सुद्धा हा मला नेहमी खुन्नस देतो, हाच तो रहीम कुरेशी हा सुरज ठोंबरे ला भेटत असतो, आज त्याचा खेळ खल्लास करू” असे म्हणून शिवीगाळ करत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. तसेच कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. फिर्यादीचे मित्र त्याला वाचवण्यासाठी मध्ये आले असता आरोपींनी त्यांना देखील लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत दोघांना पकडले आहे. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.