Pune News : खर्चासाठी पैसे न दिल्याने मालकावर कोयत्याने सपासप वार, विश्रांतवाडी परिसरातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नेहमी दुकानात येणाऱ्या एका ग्राहकाने खर्चासाठी पैसे न दिल्याने मालकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. विश्रांतवाडी येथे हा प्रकार घडला आहे.

संजय लक्ष्‍मण गोयल (वय 28, महालक्ष्मी विहर सोसायटी विश्रांतवाडी पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद उत्तम पवार (वय 35, रा.रामगड वस्ती, कळसगाव, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीतील कळस येथे संजय गोयल यांचे हार्डवेअर व इलेक्ट्रिकल्सचे दुकान आहे. तर विनोद हा पेंटिंगचे कामे करतो. तो पेंटिंगचे साहित्य घेण्यासाठी येत असे. दरम्यान रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विनोद दुकानात आला. त्याने संजय यांच्याकडे 500 रुपये मागितले. पण संजय यांनी धंदा न झाल्याने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने थांब तुझा जीवच घेतो, अशी धमकी देत तेथून निघून गेला. त्यानंतर तो थोड्या वेळातच हातात लोखंडी कोयता घेऊन परत आला. त्याने पैसे न दिल्याच्या रागातून संजय गोयल यांच्या मानेवर कोयत्याने वार केला. यानंतर तो पसार झाला. यात संजय हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.