Pune News : मामलेदार कचेरीत चोरी करण्याचा प्रयत्न; सराईत चोरटयाला अखेर खडक पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मामलेदार कचेरीत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर खडक पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात हा प्रकार घडला होता.

आकाश उर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय 24, रा. काशेवाडी भवानी पेठ) असे या चोरट्याचे नाव आहे.
आकाश हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात चोरीचे तबल 16 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान गेल्या महिन्यात (4 जानेवारी) मामलेदार कचेरीत चोरीचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. माहिती घेत असताना ही चोरी आकाश उर्फ झुरळ्या याने केली असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी झुरळ्याला त्याच्या भवानी पेठेतील घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने मामलेदार कचेरीत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. याशिवाय त्याने शुक्रवार पेठ आणि टिंबर मार्केटमध्येही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून घरफोडीमधील 15 हजार 200 रुपये रोकड व दोन चांदीचे क्वाईन पोलिसांनी जप्त केले आहेत.

त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात 13 तर समर्थ पोलीस ठाण्यात 3 असे एकूण 16 घरफोडीचे गुन्हे केले आहेत. त्याला 3 घरफोडीच्या गुन्ह्यात त्याला 1 वर्षाची शिक्षा झाली आहे.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुशील बोबडे, उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, अजीज बेग, फहिम सैय्यद, गणेश सातपुते, संदीप पाटील, अमेय रसाळ, सागर केकाण, अनिकेत बाबर, राहुल मोरे, रवी लोखंडे विशाल जाधव यांच्या पथकाने केली आहे.