Pune News : बनावट लेखापरीक्षण प्रकरणी लेखापरीक्षकास पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहकारी गृहरचना संस्थेचे बनावट लेखा परीक्षण केल्याप्रकरणी तत्कालीन लेखापरीक्षकास मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

रवींद्र चंद्रकांत गायकवाड (वय ३७ रा. इंदिरानगर बिबवेवाडी) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात राजेश भुजबळ (वय ५४, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम तसेच आयकर अधिनियम अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड याने गुलटेकडी भागातील अरिहंत सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेचे सन २०१३-१४ या वर्षाचे लेखा परीक्षण करून बनावट लेखापरीक्षण अहवाल दिला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत संस्थेचे कार्याध्यक्ष व सचिव व यांच्याकडून गुन्ह्यांकरिता वापरलेले ९२ व्हाउचर व इतर कागदपत्रे करण्यात आले आहे.

संस्थेमध्ये गैरव्यवहार असतानाही अ वर्ग कसा दिला ?
आरोपीने बनावट लेखापरीक्षण का केले यासाठी त्यांना आर्थिक फायदा झाला आहे का? गृहरचना संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार असतानाही संस्थेचे लेखापरीक्षण अहवाल अ वर्ग कसा दिला ? तसेच आरोपी गायकवाड याने तत्कालीन अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत संगनमत करून संस्थेच्या रकमेचा अपहार केला आहे का? याबाबत तपास करण्यासाठी सरकारी वकील संजय दिक्षीत यांनी आरोपीस पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली ती मान्य करीत न्यायालयाने आरोपीस १७ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.