Pune News : गैरव्यवहार प्रकरणात पुण्यातील बॅंकेच्या अध्यक्षाला अटक; 2 कोटी 69 लाख रुपयांचा गैरव्यवहार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपळे निलख येथील श्री छत्रपती अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेमध्ये कर्ज आणि ठेवीत दोन कोटी ६९ लाख ८३ हजार ८५५ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणात सांगवी पोलिसांनी बँकेच्या अध्यक्षाला अटक केली आहे. विशेष न्यायालयाने त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

विलास एकनाथ नांदगुडे (वय ६१, रा. पिंपळे निलख) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायदा, फसवणूक आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भगवान बोत्रे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना एक एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ दरम्यान घडली. या प्रकरणात आणखी नऊ जणांवर गुन्हा दाखल आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली. गुन्हा घडलेल्या कालावधीत तो अध्यक्ष होता. गुन्ह्यातील रक्कमेबाबत तपासणे करणे, बनावट कागदपत्रे कोठे बनवली, इतर गुन्हा दाखल असलेल्यांच्या शोधासाठी, तसेच, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्याच्याकडे सखोल तपास करणे आवश्‍यक आहे. यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी ॲड. कावेडिया यांनी केली.