Pune News : शेतकरी आंदोलनामुळे बासमती तांदळाची 1000 रुपये प्रति क्विंटल ने दरवाढ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पंजाब हरियाणा सीमेवर गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या किसान आंदोलनाचा फटका बासमती तांदळाला बसला आहे. सीमा बंद असल्याने या तांदळाच्या होणाऱ्या वाहतूकीला अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी मागणी इतका तांदूळ उपलब्ध होत नसल्याने बासमती तांदळाच्या दरात क्विंटला सरासरी 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. अशी माहीती ‘जयराज ग्रुप’चे संचालक व तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली.

यंदा बासमती तांदळाचे उत्पादन चांगले असले तरी शेतकरी आंदोलनाचा फटका या तांदळाला बसला आहे. आंदोलन संपल्यानंतरच बासमती तांदूळ देशातील विविध बाजारपेठांत आवश्‍यक त्या प्रमाणात पोचू शकणार असल्याचेही शहा यांनी सांगितले. यंदाचा हंगाम 15 नोव्हेंबरला सुरु झाला. हंगाम सुरु झाल्यानंतर काहीच दिवसांनी सदर आंदोलन सुरु झाले. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमधून होणारी तांदळाची वाहतूक विस्कळीत झाली. राइस मिल धारकांनीही धोका पत्कारून तांदळाची वाहतूक करण्यास नकारघंटा दिल्याने पुरेशा प्रमाणात बासमती व त्याचे सर्व उपप्रकार मिळणे अशक्‍य बनले आहे.

बासमती तांदळाला देशाबरोबर आंतराष्ट्रीय बाजारातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. हल्ली गेल्या काही वर्षापासून पारंपारिक बासमती तांदूळ घेण्याचे प्रमाण घटत चालले आहे. त्या ऐवजी स्टीम बासमती तांदळाचे प्रकार जसे; 1121, 1509, 1401, शेला बासमती आदि प्रकारांना मागणी वाढत चालली आहे. या तांदळाची लांबी पारंपारिकपेक्षा जास्त असल्यामुळे हॉटेल, केटरिंग सारखे व्यावसायिकही यांकडे आकर्षीत झालेले आहेत.

यंदाचा हंगाम गेल्या वर्षीपेक्षा कमी दराने सुरु झाला. 15 नोव्हेंबरला सिजनच्या सुरुवातीला 1121 बासमती तांदळाचे दर जागेवर 6000 ते 6500 रुपयांपर्यंत होता. आता त्यात 100 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ होऊन सध्या ते 7000 ते 7500 रुपये प्रति क्विंटल आहेत. तर पारंपरिक बासमती तांदळाचे दर सिजनच्या सुरुवातीला 9000 रुपये प्रति क्विंटल जागेवर निघाले होते आता त्यात प्रति क्विंटलला 1000 रुपये वाढ होऊन ते 10000 रुपये प्रति क्विंटल असे आहेत. यामुळे स्थानिक बाजारातही पारंपरिक बासमती, 1121 बासमती व इतर बासमती मध्ये सुद्धा 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल ने वाढ झाली आहे.

बासमती तांदळाचा भारत हा प्रमुख निर्यातदार देश आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत सुमारे ३१ लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली असून त्याचे मुल्य रुपयांमध्ये 20 हजार कोटी इतके आहे. यंदा बासमतीची निर्यात चांगली म्हणजे 45 लाख टन अथवा त्याहूनही जास्त होवू शकेल आणि त्याचे रुपयांमध्ये मुल्य 30 ते 31 हजार कोटी रु. इतके असेल असेही त्यांनी सांगितले.

यंदा बासमतीचे पिक चांगले आहे. पंजाब हरियाणा सीमेवर सुरु झालेल्या किसान आंदोलनामुळे खरेदी विक्री प्रक्रीयेत अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे दरात वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामाचा आढावा घेतल्यास यंदा निर्यातही चांगली होइल. नॉन बासमतीप्रमाणे बासमती तांदळालाही चांगली मागणी राहिल हे निश्‍चित.