Pune News : भिमा कोरेगाव हल्‍ला प्रकरण ! न्यायाधिशांनाच देणार एक लाख सह्यांचे निवेदन – रिपब्लिकन युवा मोर्चाची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भिमा कोरेगाव हल्‍ला प्रकरणामध्ये सरकारच्या वतीने 40 जणांचे चार्जशीट दाखल करण्यात येणार असून त्यामधून संभाजी भिडे यांना वगळण्यात आले आहे. सरकारने सर्व प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करुन सहा महिन्याच्या आत निकाल लावावा. तसेच, या मागणीचे एक लाख सह्यांचे निवेदन उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे आणि स्नेहल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. या प्रकरणामध्ये एकुण 1500 आरोपींचा समावेश होता. परंतु, संभाजी भिडे यासह उर्वरित 1400 आरोपींना संरक्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा आंबेडकरी जनतेचा विश्‍वासघात आहे. संबंधित सर्व आरोपींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी एक लाख सह्यांची मोहिम सुरु करण्यात आली असून त्याचे निवेदन सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन युर्वा मोर्चा आणि सहयोगी पक्ष व संघटना यांच्या वतीने ईमेलव्दारे 25 हजार व्यक्‍तीगत निवेदन ही दिले जाणार असल्याचे डंबाळे यांनी यावेळी सांगितले.