Pune News : बीएचआर प्रकरण : सॉफ्टवेअरच्या मदतीने सूरज झंवर करायचा टेंडरमध्ये गैरव्यवहार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  लिलावात ठेवलेल्या संपत्ती खरेदी करता याव्यात यासाठी लिलाव प्रक्रियेत वापरण्यात येणा-या सॉफ्टवेअरचा भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर याचा मुलगा सूरज झंवर आधार घेत. सॉफ्टवेअरच्या मदतीने लिलावाचे कोड आधीच माहिती करून घेऊन सर्वात जास्त रकमेचे टेंडर भरत असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.

सूरज याने या गुन्ह्यातील इतर आरोपींशी संगनमत करून साई मार्केटिंग अ‍ॅन्ड ट्रेडिंग कंपनीच्या नावाने स्वत:च्या लॅपटॉपवरून वेगवेगळे टेंडर भरले आहे. मात्र, बीएचआर सॉफ्टवेअर व टेंडर प्रक्रिया ही सूरज याच्या ऑफिसमध्ये दिसण्याकरिता त्याचा साथीदार कुणाल शाह याने संबंधित सॉफ्टवेअर झंवरच्या कार्यालयात इन्स्टॉल केले होते. दोन्ही कार्यालये ऑनलाईन लिंक करण्यात आली होती. त्यामुळे सुरजला शाह याच्याकडून टेंडरचे कोड आधीच समजत होते. त्यानंतर सूरज सर्वात जास्त रकमेचे टेंडर भरत होता, अशी माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे. शनिवारी सूरज याला न्यायालयात हजर केले असता त्याची दहा दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.

सूरज याने संबंधित कंपनीच्या नावाने बीएचआर पतसंस्थेच्या निगडी येथील सात कोटी रुपयांच्या मालमत्तेचा इतर आरोपींच्या मदतीने अपहार केला. सदरची मालमत्ता दोन कोटी 11 लाख 11 हजार रुपयांना खरेदी केल्याचे भासविले. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुदत ठेवीच्या पावत्या विकत घेवुन त्या बेकायदेशीरपणे वर्ग करण्यात आल्या.

आर्थिक गुन्हे शाखेने सूरज व त्याच्या कुटुंबीयांच्या बॅंकेची माहिती घेण्याकरिता व खाते गोठविण्याकरिता विविध बॅंकांना पत्रे दिले असता आरोपींनी जळगाव येथील एसडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापक व युनियन बॅंक ऑफ इंडियाचे नाशिक येथील विभागीय व्यवस्थापक यांना फोनद्वारे धमकी देवून सर्व खाती तत्काळ खुली करण्यास सांगितली आहेत, असल्याचे तपासात समोर आले आहे.