Pune News : बिटकॉईन खरेदी-विक्री; गुजरातमधील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिटकॉईन खरेदी-विक्रीचे व्यवहार करून घेत दोघांची १७ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात गुजरात येथील एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी हा आदेश दिला. फसवणूक झालेल्या दोघांना व्यवसाय वाढीसाठी १० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

हितेश बुल्डे (रा. अहमदाबाद, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात जिग्नेश सोनी (रा. वडोदरा, गुजरात) याच्यावरही गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी सूरज सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वारगेट पोलिसात दोघांविरोधात फसवणूक आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल आहे. स्वारगेट येथील एका नामांकित हॉटेल येथे ऑक्‍टोबर २०२० च्या सुरवातीला ही घटना घडली. फिर्यादी आणि मित्रांना कर्ज देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

बुल्डे याने केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी विरोध केला. हा गुन्हा उघडकीस आल्यापासून आरोपीने मोबाईल बंद करून ठेवला आहे. तो ओळख लपवून राहात आहे. गुजराथ येथे जाऊन तपास करण्यात आला. मात्र त्याचा घरचे त्याबाबत माहिती देण्याचे टाळत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्याच्यावर गुजरातमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे बुल्डे याला अटक करून त्याकडे तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याचा युक्तिवाद ॲड. गेहलोत यांनी केला. न्यायालयाने ॲड. गेहलोत यांचा युक्तिवाद मान्य करीत जामीन अर्ज फेटाळला.

फसवणुकीसाठी काढले होते मुलींच्या नावाने खाते :
आरोपीने कृष्णानगर, अहमदाबाद येथील ऑफिसमध्ये मुलींच्या नावे खोटे फेसबुक खाते सुरू केले. त्याखात्यांद्वारे कर्ज देण्याबाबत जाहिरात करून नवनवीन नागरिकांना फोन करून जाळ्यात ओढले जाते. कर्ज देण्यासाठी बिटकॉईन स्वरूपात पैसे घेऊन फसवणूक केली जात असल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे.